बारामतीकर सुमारे 20 तास होते अस्वस्थ

बारामती  – अजित पवारांनी नेमका कशामुळे राजीनामा दिला याचे स्पष्टीकरण जरी शरद पवारांनी दिले होते. तरी अजित पवार शनिवारी (दि. 29) दुपारपर्यंत म्हणजेच जवळपास 20 तासांपेक्षा अधिक काळ समोर आलेले नव्हते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. अजित पवार हे नेमके कोठे आहेत हे माहित नसल्यामुळे कार्यकर्ते आणि संपूर्ण बारामती अस्वस्थ होती. मात्र, दुपारी एकच्या सुमारास शरद पवारांच्या भेटीसाठीत मुंबईतील “सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी अजित पवार गेले, त्यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात ते कैद झाले अन्‌ बारामतीकरांचा जीव भांडण्यात पडला.

दरम्यान, अजित पवार यांना अनेक आमदार खासदारांनी बारामतीत फोन करून राजीनाम्याबाबत चौकशी केली मात्र, ते कोठे आहेत हे कोणालाही समजू शकले नव्हते. बारामतीतील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे सांभाळणारे किरण गुजर यांनी देखील फेसबुकद्वारे अजित पवारांसंदर्भात एक पोस्ट टाकली होती. त्यात ते म्हणतात अजित पवारांनी आता निर्णय जनतेवर सोपवावा. तसेच अजित पवार हे बारामतीकरांचे आहेत, त्यामुळे आता अजित पवारांनी काय करायचे हे बारामतीच्या जनतेला ठरवू द्या, असे प्रेमाचे अवाहन गुजर यांनी यावेळी केले आहे. त्यामुळे बारामतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली प्रचंड अस्वस्थता यातून दिसून आली. दरम्यान, शनिवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या नाट्यावर पडदा टाकल्याने कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला असून सगळ्यांचे लक्ष आता अजित पवार बारामतीत केव्हा येणार याकडे लागले आहे.

किरण गुजर यांची फेसबुक पोस्ट

दादा .. तुम्ही अत्यंत भावनाशील आहात. तुम्ही सगळ्यांचीच मने जपली. बऱ्याच वेळी तुम्ही जवळच्यानाही गप्प बसवून बाकीच्यांची मनेही सांभाळलीत.काही झाले तरी साहेबांना दुखावले जाणार नाही, यासाठी मला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. याबाबत तुम्ही कायम ठाम आहेत. सार्वजनिक जीवनातून तुम्ही बाजूला जाऊ शकत नाहीत, काही व्यक्ती या समाजासाठी असतात. त्यामुळे तुम्ही आता केवळ तुमचे नाहीत तर संपूर्ण समाजच्या आणि बारामतीकरांचे आहात. तुमचे तालुक्‍यावर खूप प्रेम आहे त्यामुळे आता जनतेला ठरवूद्यात की दादांनी काय करायचे, कारण आता हा आमचा हक्‍क आहे.

Comments are closed.