माळेगाव – देशात आणि राज्यात राजकीय दृष्ट्या कोणतीही परिस्थिती असली तरी बारामती विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद भक्कम असल्याचे दिसून येते. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर बॅंक अपहार प्रकरणी गुन्हे दाखल झाले असले तरी संपूर्ण बारामती शहर आणि तालुक्याची पवार यांनाच साथ असल्याचे दिसत आहे. बारामती मतदारसंघात आमदार अजित पवार यांनी केलेली विकासकामे तसेच तळागळापर्यंत असलेला थेट जनसंपर्क तालुक्यातील प्रत्येक गावात असणारे कार्येकर्त्यांचे जाळे, या राष्ट्रवादीसाठीच्या जमेच्या बाजू आहेत.
बारामती विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पुन्हा अजित पवार यांचे नाव निश्चित आहे. दरम्यान, हा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडून असला तरी लोकसभा निवडणुकीपासून भाजपने येथे मोठे प्रस्थ निर्माण केले आहे, त्यांच्याकडे इच्छुकांची संख्याही अधिक आहे. शिवसेना व युतीचा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पार्टीने (रासप) अजित पवार यांच्या विरोधात लढण्यासाठी या मतदारसंघाची मागणी केली आहे. अद्याप शिवसेना-भाजपमध्ये युतीचा निर्णय झाला नसल्याने भाजप-शिवसेना 2014 प्रमाणे वेगळे लढणार का? पवार यांच्या ताकदीपुढे भाजप हा मतदारसंघ मित्रपक्षाला सोडणार का? हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.
साधारणपणे 45 वर्षांपेक्षा अधिक काळ पवार कुटुंब हे बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून पवार यांना कायम आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, पवार यांनी तो मोडून काढला आहे. बारामतीनगर पालिकेवर एकहाती सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या विरोधात सध्या चार नगरसेवक आहेत. तसेच बारामती मतदार संघात असणाऱ्या दोन सहकारी साखर कारखान्यांपैकी माळेगाव कारखाना सध्या भाजपच्या हाती आहे. राज्यात विक्रमी मतांनी निवडून येणाऱ्या अजित पवार यांचा “वारु’ रोखण्यासाठी भाजपाने कंबर कसली असली तरी बॅंक प्रकरणी त्यांच्याविषयी मोठी सहानुभुती निर्माण झाली आहे. यातून बारामतीकर पवार यांची साथ कधीही सोडणार नाही, असेच चित्र आजच्या घडमोडीतून स्पष्ट होत आहे.
शरद पवारांचे राजकीय कौशल्य…
बारामती मतदारसंघात शरद पवार 45 वर्षांची राजकीय कौशल्य वापण्यात यशस्वी होत आहे. गावंनिहाय कार्यकर्ते-नेते शोधण्याची नेमकी दृष्टी, प्रचंड जनसंपर्क, तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क त्यामुळे पवारांची सर्वसामान्याची असणारी नाळ कायम ठेवण्यात पवार यशस्वी झाले आहे.
पवार यांच्यासोबत बारामतीकर…
बारामतीची जनता 1967 पासुन शरद पवार जिकडे असतील तिकडे असते. हे आजवरचे समिकरण आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य मिळविणे हेच विधानसभेसाठी पवार यांचे टार्गेट असेल.
पवार यांच्या विरोधात…
भाजप :प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, महानंदचे संचालक दिलीप खैरे,
माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष :
रंजन तावरे,
जिल्हा सरचिटणीस :
अविनाश मोटे, युवा नेते : प्रशांत सातव.
शिवसेना : ऍड. राजेंद्र काळे,
रासप :संदीप चोपडे