पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामतीकर सज्ज

बारामती – संत तुकाराम महाराज तसेच संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामती सज्ज झाले आहे. पालखी सोबत असलेल्या वैष्णव मेळ्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पालखी महामार्गवरील रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे.

तालुक्‍यातील पालखी महामार्गावरील बारामती, पाटस, सोमेश्‍वर तसेच इंदापूर रस्ते साफसफाई तसेच दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. रस्त्यावर असलेले खड्डे बुजवण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आले आहेत.

विश्रांतीस्थळ असलेल्या काटेवाडी येथे देखील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 2 जुलै रोजी बारामती शहरात मुक्कामी आहे.

त्यानंतर हा पालखी सोहळा इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही पालखी सोहळ्याच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या माध्यमातून चोख कामगिरी बजावली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांची डागडुजी करण्यात आली असून रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे तोडण्यात आले आहेत.

वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून विविध कामे मार्गी लावण्यात आली आहेत, अशी माहिती उपविभागीय अभियंता व्ही. एम. ओहोळ व कनिष्ठ अभियंता यू. एस. नंदखीले यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.