बारामती (प्रतिनिधी) – लिमटेक( ता. बारामती )येथील कृष्णराज धनाजी जाचक या २४ वर्षीय युवकाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना बारा मार्च रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.अपहरणकर्त्यांनी कुटुंबियांना पाच कोटी रुपयांची खंडणी देखील मागितली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत पृथ्वीराज ज्ञानदेव चव्हाण ( रा.विघ्नहर्ता अपार्टमेंट संभाजीनगर) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार इसमानवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळूची रोडवरील पानसरे ड्रीम सिटीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून कृष्णराज्याचे अपहरण झाले आहे.
25 ते 30 वयोगटातील चार जणांनी टोयोटा इटीयोस गाडीतून येऊन कृष्णाराज याला मारहाण करत जबरदस्तीने गाडीत घालून नेले. त्याचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल व मोटर सायकल ची चावी देखील हिसकावून घेतलीव त्याला पळवून नेले.
असे फिर्यादीत नमूद केले आहे. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वडील धनाजी जाचक यांच्या मोबाईल वर फोन करत अपहरणकर्त्यांनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास मुलाला मुकाल अशी धमकी देखील दिली.