डोर्लेवाडी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर आज राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभागाची बारामती तालुक्यातील झारगडवाडी, माळेगाव, घाडगेवाडी, व पिंपळी येथे अवैध दारु धंदयाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 6 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारामती तालुक्यात अवैध पावडर ताडी, दारु निर्मिती केंद्रे, विक्री केंद्रे, आदी विरोधात धडक कारवाई करून गुन्हे नोंद करण्यास सुरुवात केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी विशेष मोहिम राबवून उपअधीक्षक संजय जाधव, दौड विभागाचे निरीक्षक विजय मनाळे, भरारी पथक क्र.2 पुणे निरीक्षक अनिल बिराजदार, जी विभागाचे निरीक्षक बाळासाहेब ढवळे व बारामती पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या संयुक्त पथकाने आज ही धडक कारवाई केली.
तालुक्यातील झारगडवाडी,माळेगाव, घाडगेवाडी व पिंपळी येथे अवैध दारुधंदयांवर कारवाई करून 6 वारस व बेवारस गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत झारगडवाडी येथील गणेश जाधव (वय 35 वर्षे रा. झारगडवाडी) मिनाक्षी काळे (वय 28 वर्षे रा. झारगडवाडी) यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये देशी विदेशी मद्य, गावठी दारू, रसायन असा एकुण 60 हजार 580 रुपये एवढया किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झारगडवाडी गावामध्ये अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावर अजित पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज झारगडवाडी गावांमध्ये राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. अजूनही काही लपून छपून दारूविक्री करीत आहेत. त्याच्यावर ही कारवाई झाली पाहिजे, आजच्या कारवाई मुळे काही दारूविक्रेते गुंड प्रवृत्तीचे लोक गावातील काहीजणांवर दबाब आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यांच्यावर देखील पोलिसांनी कारवाई करावी आणि या कारवाईत सातत्य ठेवावे जेणेकरून झारगडवाडी गांव दारूमुक्त होईल, त्यांना जेवढे सहकार्य लागेल ते गावच्या वतीने केले जाईल असे झारगडवाडीचे सरपंच नितीन शेडगे यांनी सांगितले.