बारामती, सांगली बंद होते मग अकोले का नाही

अकोले – बारामती व सांगली येथे करोनाबाबाधित वाढत असल्याने लॉकडाऊन होऊ शकोत, तर अकोलेत का नाही, असा सवाल उपस्थित करत अकोले तालुक्‍यात रुग्णसंख्या वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य सेवाच व्हेंटिलेटरवर आहे, असे टीकास्त्र सोडत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अकोले तालुका व्यापारी असोशिएशनच्या अकोले शहर बंदला जाहीर पाठिंबा जाहीर केला.

व्यापारी असोसिएशनच्या बंदच्या निर्णयामुळे अकोले शहर 7 दिवस बंदच राहणार आहे. काही लोक यात राजकारण करू पाहात आहेत. लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. काही मंडळी या बंदबाबत राजकारण करून व्यापारी वर्गाची एक जूट फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप पिचड यांनी केला.

तालुक्‍यात बेडची संख्या, ऑक्‍सिजन पुरवठा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, 108 नंबरच्या रुग्णवाहिकांचे प्रमाण कमी, त्याही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. उपलब्ध पीपीई किट चांगल्या दर्जाच्या नसून, त्याही पुरेशा नाहीत. आरोग्याधिकारी, सेविका या आपला जीव धोक्‍यात घालून काम करीत आहेत.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत सुविधाच नाहीत, असे ते म्हणाले. आता जर अकोले शहर बंद ठेवले नाही, तर याचे परिणाम येणाऱ्या काळात भोगावे लागतील. त्यानंतर मग कितीही दिवस बंद ठेवला, तरी पण उपयोग होणार नाही. शेवटी जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो अकोले शहरात व्यापार करणाऱ्यांनी घ्यायचा आहे. तसेच आमदार डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्‍यातील आरोग्य सुविधा देण्यासाठी काय उपाययोजना केल्या, त्या जनतेला एकदा सांगावे. मगच बंदला विरोध करावा, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती लॉकडाऊन होऊ शकते.जयंत पाटील यांची सांगली बंद होऊ शकते. मग अकोले तालुक्‍यात विरोध का? असा सवाल पिचड यांनी केला. त्याचबरोबर अकोले तालुक्‍यातील व्यापारी वर्गाच्या पाठीशी आपण कायम खंबीर उभे आहोत, असेही सांगितले. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक नामदेव पिचड, नगरसेवक परशुराम शेळके, प्रकाश नाईकवाडी, रोहिदास धुमाळ, महेश माळवे, गिरजाजी जाधव, शंभू नेहे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.