बारामती : दुकान, मॉल्स, हॉटेल्सच्या सर्व आस्थापनांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

बारामती – बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागामध्ये कोरोना विषाणू संक्रमीत रूग्ण आढळून येत आहेत. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.

त्यासाठी आपल्या आस्थापनातील सर्व मालक, विक्रेते (सेल्समन), इतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर टेस्ट रिपोर्ट जवळ ठेवण्यात यावा. ॲन्टीजेन टेस्ट केलेली असली तरी आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे. सदरची तपासणी पंधरा दिवसांकरिता ग्राह्य असल्याने दर पंधरा दिवसांनी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात यावी. रयत भवन, मार्केट यार्ड, इंदापूर रोड या ठिकाणी सकाळी 10.00 ते 4.00 या वेळेत उपजिल्हा रूग्णालय, बारामती यांचेमार्फत मोफत आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे.

कोव्हिड-19 अनुषगांने आपले दुकान / मॉल/ आस्थापनाची तपासणीसाठी येणारे नगरपरिषदेचे अधिकारी / कर्मचारी यांना संबंधित सर्वांचे आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट दाखविणे बंधनकारक आहे. सर्व आस्थापनांनी या सूचनेचे कटाक्षाने पालन करावे.

अन्यथा आपले दुकान/ संबंधित आस्थापना पुढील सात दिवसांकरिता सिलबंद करण्यात येईल. तसेच या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897, महाराष्ट्र कोव्हिड-19 उपाययोजना नियम, 2020 व भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे बारामती नगरपरिषद उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंगडे यांनी कळविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.