करोनाबाधिताच्या आले होते संपर्कात : 27 हजार 557 लोकसंख्याचा सर्व्हे पूर्ण
बारामती- बारामती शहरात करोना (कोव्हिड -19) संक्रमित रुग्ण आढळल्यापासून प्रशासन “हायअलर्ट’ झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मंगळवारी (दि. 31) 27 हजार 557 लोकसंख्याचा सर्व्हे पूर्ण केलेला आहे. त्यामध्ये “आयएलआय’चे रुग्ण 104 आहेत. संक्रमित रुग्णाच्या “हायरिस्क’ संपर्कामध्ये आलेली 22 व्यक्तींपैकी आठ व्यक्तींची करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.
संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींना कडक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय पथकामार्फत नजर ठेवली जात आहे. मजूर, बेघर व परप्रांतीय आहेत त्यांना वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींकडून व स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेल्या अन्नधान्याची 110 कीटस वाटप केले आहेत. या किटमध्ये पाच किलो आटा, पाच किलो तांदूळ, एक लिटर तेल, एक किलो दाळ ,एक किलो बटाटा, एक किलो कडधान्य, मीठ. मिरची याचा समावेश आहे.
बारामती नगरपरिषद हद्दीत सांस्कृतिक भवन ,बारामती व जिल्हा परिषद शाळा तांदुळवाडी या दोन ठिकाणी निवाऱ्याची सोय केलेली असून जे बेघर आहेत त्यांनी निवाऱ्याच्या ठिकाणी यावे त्याठिकाणी रहाण्याची व जेवणाची सोय केली आहे त्याचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहान प्रांताधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
- पोलिसांनी पुरवल्या अत्यावश्यक सुविधा
बारामती शहरातील श्रीराम नगर भागात पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तो परिसर बारामती पोलिसांनी सील केला असून तीन किलोमीटरच्या परिसरात नाका-बंदी करण्यात आली आहे. या ठिकाणच्या कुठल्याही नागरिकाला घरातून बाहेर पडता येणार नाही. तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांना या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा यामध्ये भारत गॅस, हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस सिलेंडरचे वितरण तात्काळ करण्यात आले. तसेच नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा नागरिकांच्या मागणीनुसार सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत पुढील सहा दिवस येथील परिसर पोलिसांनी सील केलेला आहे .त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता घरामध्ये राहूनच प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन पाटील यांनी केले आहे.