बारामती – अल्पवयीन मुलीस लग्नाची मागणी करीत तिचा विनयभंग केल्याच्या खटल्यात किरण अनिल सकट (रा. बारामती) यास येथील बारामती न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडितेला दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. दि. 9 जून 2013 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली होती.
पीडित अल्पवयीन मुलगी हातपंपावरून पाण्याचा हंडा घेऊन जाताना सकट याने तिचा विनयभंग केला होता. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सकट याच्या विरोधात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक जी. टी. संकपाळ यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. पीडितेने दिलेली साक्ष व जबाब विश्वसनीय असल्याने आरोपीला शिक्षा देण्यास तो पुरेसा असल्याचे ऍड. ओहोळ यांनी सांगितले.
पीडित मुलगी व आरोपी यांनी न्यायालयाबाहेर केलेली तडजोड बेकायदेशीर असल्याचा व केलेला गुन्हा तडजोड पात्र नसल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर केला. न्यायालयाने तो मान्य करीत बाललैंगिक अत्याचार कायदा कलमानुसार तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड व विनयभंगप्रकरणी एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.