Baramati News | बारामतीच्या झेडपी शाळांनी कात टाकली

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती तालुका ‘एज्युकेशनल हब’ म्हणून पुढे येत असताना येथील जिल्हा परिषद शाळादेखील आता कात टाकू लागल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांतीने जोर धरला आहे. तालुक्यातील २७५ पैकी तब्बल २४१ शाळा डिजिटल झाल्या आहेत. लिमटेक येथील प्राथमिक शाळा आधुनिक शिक्षणाचा आदर्श ठरली आहे. मात्र, काही शाळांमध्ये अद्याप संगणक आणि स्मार्ट टीव्ही यांसारख्या सुविधांची कमतरता आहे.
ही उणीव दूर करून प्रत्येक शाळा डिजिटल युगात आणण्यासाठी लोकसहभागाची गरज असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.लिमटेकची शाळा डिजिटल शिक्षणामध्ये आदर्श ठरली आहे. येथील स्वतंत्र संगणक लॅब पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर बनवते. स्मार्ट टीव्ही, वाय-फाय, डिजिटल बोर्ड आणि ‘अलेक्सा’ यांसारख्या सुविधांनी शिक्षणाला आधुनिकतेची जोड मिळाली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी शाळेचा परिसर व विद्यार्थी सुरक्षित केले आहेत. प्रत्येक वर्गाचा व्हॉट्सअॅप ग्रुप गृहपाठ आणि उपक्रमांसाठी वापरला जातो, तर ‘MAA’ वेबसाइट शिक्षणाशी संबंधित प्रश्न सोडवते.बोलक्या भिंती आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांनी शाळेचे वातावरण चैतन्यमय केले आहे.
या प्रयत्नांमुळे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात शाळेने २०२३-२४ मध्ये तृतीय आणि २०२४-२५ मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. संपर्क फाउंडेशन आणि प्रथम इन्फोटेक यांच्या पुढाकाराने तालुक्यातील २४१ शाळा डिजिटल झाल्या असल्या, तरी काही शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही आणि संगणक यांसारख्या सुविधांचा अभाव आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी तालुक्याच्या आर्थिक समृद्धीचा उपयोग होऊ शकतो.
प्रत्येक शाळा असावी डिजिटल..
बारामतीच्या आर्थिक समृद्धीचा फायदा प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी समाजसेवक, उद्योजक आणि स्थानिक नेत्यांवर आहे. सीएसआर फंड आणि लोकसहभागाने उर्वरित शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही, संगणक आणि ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून डिजिटल क्रांती पूर्णत्वास नेता येईल. लिमटेकच्या यशातून प्रेरणा घेऊन तालुक्यातील प्रत्येक शाळा डिजिटल युगात आणता येऊ शकते, अशी पालकांची अपेक्षा आहे.
आकडेवारी..
-एकूण शाळा – २७५
-डिजिटल शाळा – २४१
-डिजिटल नसणाऱ्या शाळा – ३४
-टीव्ही असणाऱ्या शाळा – २२८
-टीव्ही नसणाऱ्या शाळा – ४७
-ई-लर्निंग असणाऱ्या शाळा – ४८
-ई-लर्निंग नसणाऱ्या शाळा – २२७
-संगणक असणाऱ्या शाळा – ११७
-संगणक नसणाऱ्या शाळा – १५८
“डिजिटल उपकरणांचा फायदा होतो. अजूनही बारामती तालुक्यातील काही शाळांना या उपकरणांची नितांत गरज आहे. त्यासाठी लोकसहभाग आणि स्थानिक जागरूक नागरिकांनी मदत करणे अपेक्षित आहे.”
– नीलेश गवळी, गटशिक्षणाधिकारी, बारामती.





