Baramati News | दूध दरात तिसऱ्यांदा वाढ ; उत्पादकांना मिळणार उच्चांकी दर

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती दुध संघाच्या एकूण २६५ प्राथमिक दूध संस्था असून संघाचे सध्या प्रति दिन दूध संकलन २.२५ लाख लिटर्स एवढे आहे. संघाचे कामकाज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार चालते. बारामती दूध संघाने खरेदी दरात महिन्याभरात तीनवेळा वाढ केली. दि.१ सप्टेंबरपासून गाय दूध खरेदी दर प्रती लिटर ३५ रुपये (फॅट/एस.एन.एफ ३.५/८.५ गुणप्रतकरीता) एवढा केला आहे.
त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती संघाचे चेअरमन संजय रामचंद्र कोकरे यांनी दिली.बारामती दूध संघामार्फत सर्व प्राथमिक दूध संस्थांना दूध तपासणीसाठी अनुदानावर मिल्क ॲनालायझर, इलेक्ट्रीक वजनकाटे व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. पशुवैद्यकीय सुविधा, आर्युवेदिक उपचार पध्दत, संकलन प्रशिक्षण, मुरघास प्रशिक्षण, दिले जाते. दूध उत्पादकांना डेअरी साहित्य विभागामार्फत चाफकटर, मिल्कींग मशिन, मुरघास बॅग व मका बियाणे आदीची अनुदानावर (स्वस्त दरात) विकी केली जाते.
संघाचे पाऊच पॅकींग दूध व श्रीखंड, आम्रखंड, पनीर, दही, ताक, लस्सी, तूप, बासुंदी, पेढा, कलाकंद, खवा आदी दूग्धपदर्थाचे उत्पादन असून पॅकींग दूध व दूग्धजन्य पदार्थ “नंदन” ब्रँडने विविध शहरांमध्ये विकी होत आहे. नंदन पॅकींग दूध पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, शिर्डी, मालेगाव, लोणावळा, मुंबई, वाशी, रोहा, महाड, संभाजीनगर, अहमदनगर आदी शहरांमध्ये विकी होत असून पुणे व मुंबई येथील नामांकित हॉटेल्स्, कार्पोरेट ऑफिस, विविध नामांकित कंपन्या, हॉस्पिटल्स् आदी ठिकाणी नंदन पाऊच पॅकींग दूध व दूग्धजन्य पदार्थाची विकी केली जात आहे.
वाजवी किंमतीत नंदन पशुखाद्य..
बारामती दूध संघाचे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य व वाजवी किंमतीत बीओपी बॅगमध्ये नंदन सुप्रिम, नंदन गोल्ड, नंदन गोल्ड प्लस, नंदन सिलव्हर, नंदन काफस्टार्टर, नंदन गर्भसत्व आदी पशुखाद्य तसेच नंदन मिल्कमीन, नंदन समृध्दी (फिड सप्लीमेंट) आदी प्रकारचे दर्जेदार उत्पादने विकीसाठी बाजारात उपलब्ध असून बारामती तालुक्यासह, बार्शी, दौंड, इंदापूर, कर्जत, करमाळा, खंडाळा, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, फलटण, पुरंदर, सांगोला, शिरूर, श्रीगोंदा व माण सोलापूर आदी ठिकाणी नंदन पशुखाद्याची विकी केली जाते.





