Baramati News | महिलांसाठी मनोरंजनाचा महोत्सव ; न्यू होम मिनिस्टरला उदंड प्रतिसाद

प्रभात वृत्तसेवा
बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सहारा फौंडेशनच्या वतीने न्यू होम मिनिस्टर 2025 चे प्रभाग क्रमांक 9 खंडोबानगर, मोरगाव रोड येथे आयोजन केले होते. यावेळी महिलांनी खेळ खेळत, गाण्यांवर थिरकत आनंद लुटला. या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात न्यू होम मिनिस्टरचे निवेदक अभिनेता क्रांती मळेगावकर आणि बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर या दोघांनी अनोख्या शैलीने रंगत आणली. महिलांना विविध मनोरंजक प्रश्नोत्तरे, उखाणे, खेळ यातून वातावरण अगदी आंनदमय झाले होते. तब्बल 4 ते 5 तास महिलांचे मनोरंजन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती शहराध्यक्ष जय पाटील, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड, माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन शेंडे, माजी नगरसेविका डॉ. सुहासिनी सातव, मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद,
नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती कमरूद्दीन सय्यद, राजेंद्र सोळसकर, बाळासाहेब चव्हाण, अमोल नेवसे, ह.भ.प.भानुदास हिंगणे, संभाजी माने, दिलीप ढवाण, देविदास गावडे, पत्रकार प्रमोद ठोंबरे, तैनुर शेख, हारूण शेख, जमीर इनामदार, सुजित जाधव उपस्थित होते. कार्यक्रमास महाराष्ट्र इंडिस्ट्रीयल सप्लायर्सचे फकरूद्दीन कायमखानी व जुजर कायमखानी यांनी मोलाचे सहकार्य केले.
सचिन सातव म्हणाले की, महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. आपल्या घराला घरपण देताना हा प्रापंचिक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात. माहेर, सासर यातील त्या भक्कम दुवा असतात. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम महिलांसाठी व्हावे या दृष्टीने न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन परवेज सय्यद यांनी केले आहे.
महिलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध योजना राबविल्या. यामध्ये लाडकी बहिण योजनेचा सर्वात जास्त फायदा महिलांना झालेला आहे.महिलांचा सन्मान करण्यासाठी तसेच त्यांची क्षमता ओळखून त्यांना एकत्र आणणे, त्या क्षमतेला वाव देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. आजच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक माता, भगिनींच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून समाधान मिळाले. आनंद झाल्याचे आयोजक परवेज सय्यद यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय ढवाण, विशाल ढवाण, जयेंद्र ढवाण, गिरीष लोणकर, किरण बारवकर, महेश बारवकर, तबरेज सय्यद, आसिफ झारी, सलिम तांबोळी, अमर ढवाण, रोहन पवार, किरण काळे, विरसेन बनकर, प्रविण पवार आदींनी परिश्रम घेतले.
विजेत्यांचा जल्लोषी गौरव..
प्रथम क्रमांक पल्लवी कुंभार वहिनी यांना फ्रीज, द्वितीय मनीषा कांबळे यांना एलईडी, तृतीय प्रतीक्षा गायकवाड यांना ओव्हन, इतर दोघांनी मिक्सर, डिनरसेट बक्षिस मिळाले. यावेळी महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये सारिका खारतोडे यांना पैठणी तर लता सातव यांना वॉटर प्युरिफायर बक्षिस मिळाले.
कार्यक्रमात प्रत्येक महिलेला रिटनगिफ्ट म्हणून भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बारामती पंचक्रोशीतील महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम पाहण्यासाठी व सहभागी होत खेळण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती.
सहारा फौंडेशनकडून महिलांना संधी..
प्रदीप गारटकर म्हणाले की, आलताफ सय्यद आणि परवेज सय्यद हे समाजउपयोगी कार्यक्रम घेत आलेले आहेत. महिला या बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाने कुठेही कमी नसून त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून संधी देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. ती संधी सहारा फौंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद यांनी दिली आहे. अजित पवार हे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री व्हावेत असा आशिर्वाद महिलांनी द्यावा.





