बारामती (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती औद्योगिक वसाहतीतील उद्योग आणखी काही काळ बंदच ठेवावे लागतील. दूग्धजन्य पदार्थांवर प्रक्रियेचे काही उद्योग सुरू केले आहेत; परंतु अन्य उद्योग लागलीच सुरू होणे अशक्य असून लॉकडाउनअधिक कडक करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे स्पष्ट केले .
करोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत रविवारी (दि. 26) प्रमुख अधिकारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती पॅटर्नकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी सतर्कतेने काम करण्याची गरज आहे.
बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच करोना चाचणी सुरू होईल, याशिवाय रुई ग्रामीण रुग्णालयात करोना सेंटर तात्काळ सुरु करण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी दिल्या.