बारामती – वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभय दिगंबर काटे यास बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तालुक्यातील काटेवाडी येथे पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणारी ही घटना दि. 12 मे 2017 रोजी ही घटना घडली होती.
(दि. 12 मे) रोजी दुपारी नीरा डाव्या कालव्याच्या सणसरनजीक रायतेमळा येथे दिगंबर दादासाहेब काटे यांचा मृतदेह आढळला होता. त्यांचा शस्त्राने गळ्यावर वार करून खून करीत पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. घटनेत सुरवातीला अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासानंतर पोलिसांची संशयाची सुई मुलाकडे वळली होती. तपास तत्कालीन सहायक निरीक्षक उत्तम भजनावळे व सहायक फौजदार प्रभाकर बनकर यांनी केला होता.
पोलिसांनी अभय याला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. सुनावणी बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्यासमोर चालली. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. राजेश कातोरे यांची नियुक्ती केली होती. काटे कुटुंबीयांच्या वतीने ऍड. सचिन झालटे, एस. पी. सहाने, निलीमा खर्डे-पाटील, ज्ञानेश्वर जे. माने यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी सहायक फौजदार नामदेव नलवडे व डी. एस. जगताप यांनी सरकारी पक्षास सहकार्य केले.
खटल्यात सरकारी वकील ऍड. कातोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 13 साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांचे जबाबावरून गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाले. बचाव पक्षाने आरोपीच्या बाजूने युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.