बारामती-काटेवाडी रस्त्याची डागडुजी

‘प्रभात’च्या वृत्ताने बांधकाम विभाग खडबडून झाला जागा

भवानीनगर – बारामती ते काटेवाडीपर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यास सुरूवात झाली आहे. दैनिक “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतल्याने हे काम गतिमान झाले.

यंदा परतीच्या पावसात बारामती ते काटेवाडी गावापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले होते. काही महिन्यांपासून या मार्गावरीलत खड्ड्यांत वाढ झाली होती, त्यामुळे वाहनचालकांना अडचण निर्माण होत होती. हे खड्डे चुकवताना वाहनचालकांचे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन त्यात कित्येकजण जखमी झाले आहेत. खड्डे चुकवित असताना दुचाकीवरून महिला देखील रस्त्यावर पडलेल्या आहेत. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही हा रस्ता दुरुस्त होत नसल्याने अनेक नागरिकांनी ‘प्रभात’कडे गाऱ्हाणी मांडली होती.

‘प्रभात’मध्ये या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सडेतोड वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बांधकाम विभाग प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. इंदापूरपासून ते काटेवाडीपर्यंत रस्ता खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले होते.

इंदापूर ते काटेवाडी हा रस्ताही दुरुस्त करण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच सणसर ते काटेवाडी रस्त्यावर खड्डे असल्याने तोही रस्ता खड्डामुक्‍त होणार आहे. बारामती ते काटेवाडी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग बारामतीअंतर्गत येत आहे.

काटेवाडी ते इंदापूरपर्यंतचा रस्ता भिगवणअंतर्गत आहे. बारामती विभागातील काम पूर्ण झाले असून इंदापूर विभागातील काम येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग बारामतीचे उपविभागीय अभियंता विश्‍वास ओहळ, कनिष्ठ अभियंता यु. एस.नांदखिळे यांनी तत्परता दाखविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.