बारामती आता क्रिकेटच्या नकाशावर

डॉ. आंबेडकर स्टेडीयमवर राज्यस्तरीय, रणजी सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयकडून मान्यता

बारामती: येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमला बीसीसीआयने राज्यस्तरीय व रणजी सामने खेळविण्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. यामुळे प्रथम श्रेणीचे क्रिकेट सामने बारामतीत होणार असल्याने बारामती आता क्रिकेटच्या नकाशावर आले आहे.

बारामतीत पहिला रणजी सामना महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड असा 12 ते 15 फेब्रुवारी 2020 या दरम्यान खेळवला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र रणजी निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद गुंजाळ, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनी सोमवारी (दि. 9) दिली. याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बिरजू मांढरे यांच्यासह अभिजित चव्हाण उपस्थित होते. दाम्यान, गुंजाळ, शिर्के व बागवान यांनी सोमवारी बारामतीत येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमची पाहणी केली. महाराष्ट्राचे माजी कर्णधार व क्रिकेट खेळाडू धीरज जाधव यांनी बारामतीत त्यांची क्रिकेट अकादमी सुरू केली असून त्यांच्या प्रयत्नातूनच बारामतीत आता प्रथम श्रेणीचे क्रिकेट सामने होणार आहेत. तर बीसीसीआयचे क्‍युरेटर प्रकाश आढाव यांनी बारामतीच्या मैदानाला भेट देऊन हे मैदान प्रथम श्रेणी व रणजी सामन्यांसाठी उत्तम असल्याचा अभिप्राय दिल्यानंतर बारामतीत सामन्यांचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले.


 शुक्रवारपासून चाचणी संघांचे सामने

बारामतीत अनंत चतुर्दशीनंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच शुक्रवार (दि. 13) पासूनच निवड चाचणी संघाचे सामने सुरू होणार आहेत. केदार जाधव, राहुल त्रिपाठी, अंकीत बावणे या सारखे नामवंत खेळाडू बारामतीच्या मैदानावर खेळताना दिसतील. दरम्यान 17 ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा तीन दिवसांचा विजय मर्चंट ट्रॉफीसाठीचा पहिला सामना बारामतीत खेळवला जाणार आहे. बारामतीत होणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा हा पहिलाच सामना असेल. 18 ते 21 जानेवारी 2020 या काळात महाराष्ट्र विरुद्ध मुंबई हा चार दिवसांचा कुचबिहार ट्रॉफीचा सामना होणार आहे. बारामतीतील सर्व सामने क्रिकेटरसिकांना विनामूल्य पाहता येणार आहेत.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)