बारामती : बारामती शहरात एका तरुणीचा जी बी सिंड्रोम आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किरण राजेंद्र देशमुख असं या तरुणीचं नाव आहे. तिच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
पुण्यातील सिंहगड परिसरात शिकत असलेल्या बारामतीतील तरुणीला तीन आठवड्यापूर्वी पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला. ती बारामतीत पोहोचल्यानंतर जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला. बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी पुण्याला उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. तीन आठवडे जी बी सिंड्रोमला दिलेला लढा आज संपला. अखेर आज उपचारादरम्यान किरणांची प्राण ज्योत मालवली.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात उद्रेक झालेल्या जीबीएस सिंड्रोमचे अनेक रुग्ण आजही व्हेंटिलेटरवर आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात सिंहगड परिसरात शिकण्यासाठी गेलेल्या व तेथील नातेवाईकाकडे राहत असलेल्या किरण हिला बारामतीत पोहोचल्यानंतर त्रास जाणवू लागला. तिच्या कुटुंबीयांनी तातडीने तिला बारामतीतील तज्ञ डॉक्टरांना दाखवले. याच दरम्यान पुण्यामध्ये जीबीएस आजाराचे रुग्ण वाढत असल्याची माहिती प्रसारित होत होती.
तिची काही लक्षणे अशाच स्वरूपाची दिसू लागल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी पुण्याला जाण्याचा सल्ला दिला. तिला उपचारासाठी पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हाच तिला जीबी सिंड्रोम झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. आज तिची या आजाराविरोधातील लढाई संपली.
किरणचे वडील हे रिक्षाचालक आहेत. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत आल्यानंतर तिच्यावर सुरू असलेले उपचारांची माहिती त्यांना देण्यात आली. तेव्हा देशमुख यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत अजित पवार यांनी किरणला नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली होती. त्यानुसार तिच्यावर नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव यांनी दिली.
दरम्यान बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व सिल्व्हर जुबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी सांगितले की, किरणचा मृत्यू हा जीबीएस सिंड्रोम आजाराने झाला असून त्याची लागण पुण्यातील सिंहगड परिसरात झाली होती. 27 जानेवारीपासून तिच्यावर पुण्यामध्ये उपचार सुरू होते. यादरम्यान तिची प्रकृती खालावत गेली. दरम्यान, जगताप व खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती मध्ये कुठेही जीबीएस चे रुग्ण आढळलेले नाहीत.