बारामती (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत येथील सायलीहील परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या परिसरात 151 वृक्षांची लागवड करण्यात आली. विविध प्रकारच्या तीस पक्षी व प्राण्यांचे माहिती फलक लावण्यात आले. परिसरातील लहान मुलांना पक्षी व प्राण्यांबद्दल माहिती मिळावी तसेच पर्यावरण संवर्धनाची ओढ लहान मुलांच्या निर्माण व्हावी या उद्देशाने मंगेशनाना ओमासे मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी स्लो सायकलींग स्पर्धेची देखील आयोजन करण्यात आले होते.
बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायली हिल येथील परिसरात ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर ,आयर्नमॅन सतीश ननवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
बारामती टेक्स्टाईल पार्कचे व्यवस्थापक चंकेश्वर यांच्या सहकार्यातून सायली हिल परिसरात 151 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सायली हिल येथील नागरिकांनी या वृक्षांचे पालकत्व स्वीकारले. याच परिसरात 30 प्रकारच्या पक्षी व प्राण्यांची माहिती असलेले फलक लावण्यात आले. पर्यावरणाचा घटक म्हणून परिसरात असलेल्या पक्षी व प्राण्यांचे संवर्धनाविषयी लहान मुलांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने फलक लावण्यात आले आहेत.
“जवळपास २०० हून अधिक देशांत पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण दिन केवळ एक दिवस साजरा न करता पर्यावरण टिकविण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सुनेत्रा पवार अध्यक्षा असलेल्या एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या पर्यावरण संस्थेचा मी सदस्य आहे. संस्थेच्या प्रेरणेने व सायलीहिल येथील नागरिकांच्या सहकार्याने येथे वृक्षारोपण ,पक्षी व प्राण्यांची माहिती फलक तसेच स्लो सायकलींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
-मंगेश ओमासे ,सामाजिक कार्यकर्ते
पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरणपुरक स्लो सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शारीरिक अंतर ठेवत राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे ,गटनेते सचिन सातव तसेच जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी पर्यावरण दिनाचे महत्व विशद करून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.