बारामतीत गतवेळपेक्षा तीन टक्‍क्‍यांनी घट

मतदारसंघात सरासरी 68.28 टक्‍केमतदान

बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघात 368 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. बारामती शहर व तालुक्‍यात 68.28 टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का कमी राहिला त्यानंतर दुपारच्या सत्रात मतदानाची टक्केवारी वाढली. 2014च्या निवडणुकीपेक्षा यावेळच्या निवडणुकीत बारामतीच्या मतांची टक्केवारी 3 टक्‍क्‍यांनी घटली. 2014 मध्ये 71 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

बारामती शहरात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली त्यानंतर नऊ वाजता 7.37 टक्के मतदान झाले. अकरा वाजता मतांचा टक्का वाढला तो 20.87 पर्यंत पोहोचला. दुपारच्या सत्रात एक वाजता 37.56 तर तीन वाजता 52.39 टक्के इतका झाला. शेवटच्या दोन तासात पाच वाजता 64.22 तर अखेरीस सहा वाजता 68.28 टक्के मतदान झाले. बारामती विधानसभा मतदारसंघात 3 लाख 41 हजार 657 मतदारांपैकी 2 लाख 33 हजार286 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एक लाख 26 हजार 642 पुरुष मतदारांनी तर एक लाख 7 हजार 43 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवाय इतर एका मताचा देखील समावेश आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, आशाताई पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार या सर्वांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे मतदानाचा हक्क बजावला.

राज्यात परिवर्तन होईल असा विश्‍वास अजित पवार यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभांना राज्यांमध्ये जो उदंड प्रतिसाद मिळाला विशेषतः तरुणाई शरद पवार यांच्या पाठीशी होती, हे पाहून राज्यात एक वेगळेच चित्र निर्माण होईल, असे अजित पवार यांनी सांगितले. दोन दिवसापासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण आहे, त्याचा परिणाम मतदानावर होणार नाही, लोक उत्साहाने घराबाहेर पडून मतदान करतील, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.