खडू फळा ऐवजी गुगल आणि युट्युब
बारामती (प्रतिनिधी) – करोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील सर्वच महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पद्धतीने अभ्यास घेण्यात येत आहे. यासाठी प्राचार्य डो. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टडी फ्रॉम होम या उपक्रमाची सुरुवात डेलोनिक्स सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये करण्यात आली असून यामध्ये विविध प्रकारच्या ओनलाईन मोड्यूल्सचा योग्य प्रकारे वापर करण्यात येत आहे .
या मध्ये संस्थेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या अनुसरून माहिती देणे, बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे चाचणी परीक्षा घेणे, शैक्षणिक व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करणे, प्रश्ननांची उत्तरे आणि विद्यार्थ्यांचे समाधान करणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे यासह त्याच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे आदी बाबींचा या उपक्रमात समावेश आहे.
ऑनलाईन अभ्यासाला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गूगल क्लासरुम, गूगल फोर्म, यूट्यूब, वर्डप्रेस वेबसाईट, स्क्रीन कास्ट ओ म्याटीक, क्रॉसवर्ड, ऑनलाईन टेस्ट सीरीज सारख्या विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विध्यार्थीच्याकडून अभ्यास करुन घेतला जात आहे.
प्रचलित खडू आणि फळा याऐवजी यूट्यूब आणि गुगल वरील ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांच्या समोर ठेवला जात आहे. या पद्धतीस विध्यार्थी व त्यांच्या पालकांचाही उत्स्फूर्त आणि उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
महाविद्यालयामार्फत विद्यार्थी व त्यांचे पालक यांसाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केले असून माहितीच्या आदान-प्रदान द्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण सुरू आहे.
संस्थेतील सर्व प्राध्यापकांनी त्यांचे विषयानुरुप व्हिडिओ क्लिपची निर्मिती केली असून ते ई -लर्निंग चॅनेलवर प्रसारणासाठी पाठविलेली आहेत.
या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी बोलताना सांगितले की, सध्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने महाविद्यालय बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय, असा प्रश्न होता. मात्र, आमच्या उपक्रमशील आणि तंत्रस्नेही शिक्षकांनी हा उपक्रम सुरू करून विद्यार्थी आणि पालकांचा फायदाच केला आहे. तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सल्ला देताना सांगितले की, आपण जिथे आहात तेथून घरातूनच काम करा, नियमितपणे हात धुवा त्याचबरोबर घरी काम करताना मास्कचा वापर करा व तुम्ही काम करत असलेली जागा रोज साफ करा ज्यामुळे विषाणूचा संसर्ग होणार नाही. त्याचबरोबर लॅपटॉप, कॉम्युटर, मोबाईल यांचा साफ करूनच वापर करावा.
संस्था अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव, विश्वस्त व प्राचार्यानी सर्व प्राध्यापकांचे व त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे भर भरून कौतुक केले.