बारामती | शहरातील कोविड केअर सेंटर रूग्णांसाठी ठरताहेत वरदान

बारामती ( प्रतिनिधी) : बारामती शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढती रुग्ण संख्या हा सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. रूग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या दोन कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या शेकडो रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुक्त शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या बारामतीत सध्या कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचे कारणदेखील तसेच आहे. सध्या शहर व तालुक्यात सर्वेक्षण करून कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. वाढत्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी आरोग्य विभाग, प्रशासन तसेच काही संस्था अहोरात्र मेहनत घेत आहेत.

रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासकीय तसेच खासगी रुग्णालये देखील फुल्ल झाले आहेत. अशातच रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृह तसेच तारांगण मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. या दोन कोविड केअर सेंटर मुळे शेकडो रुग्णांना उपचार मिळणे शक्य झाले आहे.

एखाद्या खाजगी प्रशस्त रुग्णालयाला लाजवेल अशा प्रकारची चोख व्यवस्था याकोबी केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. डॉक्टर ,नर्स तसेच स्वयंसेवक स्वयंसेविका येथे कार्यरत आहेत. उपचारांबरोबरच रुग्णांच्या चौरस आहाराची काळजी आपुलकीने घेतली जात असल्याची प्रतिक्रिया येथून बरे होऊन बाहेर पडलेल्या रुग्णांनी दिल्या आहेत. कोरोना काळात शहरातील ही दोन कोविड केअर सेंटर महत्वपूर्ण ठरत असून त्यामुळे आरोग्य विभागाला हातभार लागला आहे.

बारामती शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरातील सूर्यनगरी भाग कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय आहे. ज्येष्ठ नगरसेवक किरण दादा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक म्हणून आम्ही नटराज नाट्य कला मंडळ संचलित कोविड केअर सेंटर मध्ये काम करत आहोत. कोविड केअर सेंटर मुळे रुग्णांना आधार मिळाला आहे.

– किशोर मासाळ (प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काॅग्रेस)

दोन्ही कोविड सेंटर मध्ये सध्या शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. तारांगण येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचारांबरोबरच रुग्णांच्या आहार निद्रा तसेच मनोरंजनाची देखील काळजी घेतली जाते.त्यामुळे बरे होऊन बाहेर पडताना रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असल्याचे वस्तीगृहाच्या अधीक्षिका सविता खारतोडे यांनी सांगितले. स्वयंसेवक म्हणून अजिज शेख, संजयभाऊ खडके, नितीन मासाळ कार्यरत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.