जळोची- बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुणवडी येथे दारू अड्ड्यावर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक संजय जगदाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदरची कारवाई करण्यात आली.
गुणवडी विद्यानगरी येथील रहिवासी असणारे अंबादास यशवंत चव्हाण, लक्ष्मी यशवंत चव्हाण हे दोघे वारंवार दारू भट्टी लावून दारू गाळप करत असतात. त्यांच्यावर याआधीही अनेकदा कारवाई केली आहे. हे दोघे सतत वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून हातभट्टी लावतात. पोलिसांनी एका गोपनीय माहितीदारा मार्फत वरील दोघे कुठे दारू काढतात याची माहिती मिळवली असता, गुणवडी हद्दीतील सुभाबळीच्या बेटांमध्ये दारू काढताना आढळून आले. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून दोन दोनशे लिटर मापाचे प्लास्टिक बॅरल व त्यामध्ये असणारे चारशे लिटर तयार रसायन तसेच 15 लिटर गावठी तयार दारू व लोखंडी कढईत चारशे लिटर द्रावण, विषारी नवसागर, दहा किलो काळा गूळ व नशा येण्यासाठी वापरण्यात आलेले 10 बॅटरी सेल. असा दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून तो नष्ट केला.
सदर छाप्यात मिळून आलेले साहित्य मानवी शरीराला अपायकारक असल्याने सदर प्रकरणी वरील दोघांवर भादवि कलम 328 तसेच दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी जे लोक भड्डी लावून देतात त्यांचीही चौकशी होणार आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक ढाकणे पोलीस कर्मचारी कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडु कोठे, महिला पोलीस कर्मचारी सुनंदा माने यांनी केली..