Baramati By-Election Result: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. २४ व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2 लाख 18 हजार 969 मतांची विक्रमी आघाडी घेत देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. या विजयामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २०१९ मधील १ लाख ६५ हजारांच्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडीत काढला असून, प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अजित पवारांचे सर्व विक्रम मोडले – बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी त्यांनाही मागे टाकले आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास या विजयाची व्याप्ती लक्षात येते. सुनेत्रा पवार (२०२६ पोटनिवडणूक): 2 लाख 18 हजार 969 मताधिक्य (ऐतिहासिक विक्रम) अजित पवार (२०१९): १,६५,२६५ मताधिक्य अजित पवार (२०१४): ८९,७९१ मताधिक्य अजित पवार (२०२४): १,०१,००० मताधिक्य देशातील सर्वात मोठे मताधिक्य – सुनेत्रा पवार यांनी केवळ राज्याचाच नव्हे, तर देशाचा विक्रम मोडल्याचा दावा केला जात आहे. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातून सुनील कुमार शर्मा २ लाख १४ हजार ८३५ मतांनी विजयी झाले होते. सुनेत्रा पवारांनी हा आकडा ओलांडून ‘न भूतो न भविष्यती’ असा विजय संपादन केला आहे. अपक्ष उमेदवारांचा धुव्वा – या निवडणुकीत महाविकास आघाडीने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला होता, मात्र २२ अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक पार पडली. निकालानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि अभिजित बिचकुले यांच्यासह सर्वच अपक्षांना मतदारांनी नाकारले. बहुतांश उमेदवारांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नाही. “हा विजय अजितदादांच्या स्मृतींना आदरांजली” – विजयानंतर सुनेत्रा पवारांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, “हा विजय केवळ राजकीय यश नसून आदरणीय अजितदादांच्या कार्याला दिलेली श्रद्धांजली आहे. दादांच्या पश्चात झालेली ही पहिलीच निवडणूक होती, त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. बारामतीकरांनी जो विश्वास दाखवला, तो मी कधीही सार्थ ठरवेन.” जल्लोष टाळण्याचे आवाहन – विजयाचा आकडा मोठा असला तरी पवार कुटुंबीयांनी संयमी भूमिका घेतली आहे. खासदार पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “आजचा दिवस आनंदाचा असला तरी परिस्थिती पाहता कोणीही जल्लोष करू नये. आचारसंहिता संपल्यानंतर मी बारामतीत जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असेन.”