नवी दिल्ली – लॉकडाऊन ज्या क्षेत्रात अंशतः शिथिल करण्यात आले आहे, त्या ठिकाणी मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र अशा भागातील रिटेल दुकानावर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी मद्य निर्मिती उद्योगाने अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यामध्ये सध्या बंद असलेल्या बारना रिटेल विक्रेत्याप्रमाणे विक्री करून देण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे रिटेल दुकानावर होत असलेली गर्दी कमी होण्यास मदत होईल, असे मद्य उत्पादकांनी म्हटले आहे.
ग्राहकांना घरपोच मद्य विक्री करण्याच्या शक्यतेवर विचार केला जावा, असे ऑल इंडिया ब्रेवर्स असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे. ई-कॉमर्स कंपन्याबरोबरच अन्न पुरवठा करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्याच्या माध्यमातूनही परवानाधाक मद्यविक्रेत्याकडून मद्य खरेदी करून ते ग्राहकांना पुरविण्याच्या शक्यतेवर विचार केला जाऊ शकतो, असे या संघटनेने सुचविले आहे.
राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागांनी मद्य विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म विकसित केल्यास या प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना घरपोच सेवा पुरविली जाऊ शकते. या संघटनेने म्हटले आहे की, विविध राज्यांमधील बारमध्ये सध्या 3 हजार कोटी रुपयांचा मद्यसाठा अडकून पडलेला आहे. जर या बारना किरकोळ दुकानाप्रमाणे विक्री करू दिली तर त्यांचे अडकलेले भांडवल त्यांना परत उपलब्ध होईल.
त्यामुळे रिटेल दुकानावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. अर्थात असे करणे सध्याच्या कायद्यामध्ये काही दुरुस्त्या केल्याशिवाय शक्य नाही. सध्याच्या परिस्थितीत या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यास हरकत नाही असे नॅशनल रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनुराग कटरियार यांनी सुचविले आहे.
रिटेल दुकानावर ग्राहकांना प्रत्यक्ष जावे लागते. त्याठिकाणी पैसे देताना आणि मद्य घेताना अनेकदा स्पर्श होतो. अशा परिस्थितीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ई-कॉमर्सच्या माध्यमातून हा व्यवहार करण्यास हरकत नाही. त्याचबरोबर हा व्हायरस सध्या जरी गेला तरी तो पुन्हा परतण्याची शक्यता अनेक वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला भावी संकटाचा मुकाबला करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर नव्या वितरण व्यवस्था विकसित करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.