विश्रांतवाडी : धानोरी मधील विकासाचा अनुशेष भरून काढत सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे. परिसरातील रहिवाशांना भेडसावणारा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संपूर्ण प्रभाग टँकरमुक्त करणार आहे. पोरवाल रस्त्यावरील पथदिव्यांची व्यवस्था करणार आहे. लोहगाव, धानोरीला जोडणाऱ्या आणि विकास आराखड्यातील रखडलेल्या पोरवाल रस्त्याच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण करणार आहे.
पोरवाल रस्ता चौकातील वाहतूक कोंडीचा यामुळे प्रश्न मिटणार आहे. या भागातील नागरिकांचे जीवन सुसह्य करून विकास करणार आहे, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वडगावशेरी मतदारसंघातील उमेदवार बापूसाहेब पठारे म्हणाले.
धानोरी, पोरवाल रस्ता परिसरातील झंझावाती पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. धानोरी भैरवनाथ मंदिर, विठ्ठल मंदिर, बुद्ध विहार,सिद्धार्थ नगर, ब्रह्मकुमारी केंद्र,मुंजाबावस्ती, गणपती मंदिर चौक,स्वप्नील ट्रेडर्स,चौधरीनगर, टिंगरे बंगला,मुंजाबावस्ती, धनेश्वर शाळा या परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. धानोरीचे ग्रामदैवत कालभैरवनाथाला नारळ वाढवून तुतारीचा आवाज बुलंद करीत आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जयजयकार करीत पदयात्रेला प्रारंभ झाला.
पदयात्रेत बापूसाहेब पठारे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवती आणि महिलांनी बापूसाहेब पठारे यांचे औक्षण केले तर पठारे यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले,तरुणाईशी संवाद साधला.
वडगावशेरी मतदारसंघात पठारे यांनी पदयात्रांचा धडाका लावला असून मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढला आहे. मतदारांशी थेट संवाद आणि संपर्क साधत ते विजयाचा दावा बुलंद करीत आहेत.मतदारांना नावानिशी ओळखणारे उमेदवार म्हणून त्यांची ख्याती आहे.