विश्रांतवाडी : वडगावशेरी विधानसभा मतदारसांघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी मतदारांना प्रत्यक्ष गाठीभेटीवर जोर दिला आहे. ते थेट मतदारांशी संवाद साधत असल्याचे दिसून येत आहे. मतदारांना काम करणारा उमेदवार हवा आहे. पठारे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती नागरिकांना दिली जात आहे.
तसेच मतदार संघातील असलेल्या समस्यांचा पाढा नागरिक पठारे यांच्या समोर वाचत आहेत. त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन पठारे यांच्याकडून दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे. मतदारसंघातील प्रत्येक भागातून ते पदयात्रा काढत आहेत. पठारे यांच्या प्रचारार्थ खराडी आणि चंदननगर परिसरात गुरुवारी (दि.०७) पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.
या पदयात्रेला स्थानिक नागरिकांसह महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. या पदयात्रेत नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष भेटीगाठी घेत असताना पठारे यांचे महिला भगिनींकडून औक्षण करून त्यांचे स्वागत केले जात आहे. पदयात्रेत बापूसाहेब पठारे यांनी सर्व स्तरातील मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.
तसेच, महाविकास आघाडीची भूमिका समजावून सांगितली, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीरसभा आयोजित केली आहे.येरवडा येथील लक्ष्मीनगरमधील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे सभागृहात शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी ६ वाजता सभा संपन्न होणार आहे.