पिंपरी – करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याची चिन्हे बाजारात दिसू लागली आहेत. गणेश मंडळांनी देखाव्यांवरील खर्च कमी केला आहे. नागरिकांकडून घरोघरी बसविण्यात येणाऱ्या गणेशमूर्तींसाठी आकर्षक सजावट केली जात आहे. घरगुती सजावटीच्या साहित्याची विक्री होण्याची अपेक्षा विक्रेत्यांना आहे. परंतु अवघ्या तीन दिवसांवर गणरायांचे आगमन येऊन ठेपलेले असतानाही अद्याप बाजारात दरवर्षी इतकी लगबग दिसून येत नाही. परंतु व्यावसायिकांनी गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक विद्युतमाळा व इतर साहित्यांनी आपली दुकाने सजविली आहेत.
गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी सुरू झाली आहे. घरगुती स्वरुपात बसविण्यात येणाऱ्या गणेशमूर्तींसाठी गणेशभक्तांकडून आकर्षक सजावट केली जाते. विविध रंगसंगतीमधील मखर व विविध प्रकारातील विद्युतमाळांची मागणी असते. भारतीय बनावटीच्या सिंगल आणि मल्टी कलर विद्युतमाळा लक्ष वेधून घेत आहेत. त्याशिवाय, लेदर फोकस, नॉर्मल इंडियन फोकस, पॉवर लाइट, थ्री स्टार चांदणी, रोटेटिंग बल्फ आदींनाही मागणी आहे. सिंगल आणि मल्टीकलर माळा 250 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. फोकस 200 ते 400 रुपये दरात मिळत आहेत. थ्री स्टार चांदणी 290 रुपयांत तर, पावर लाईट 1600 रुपयांपर्यंत मिळत आहे. अशा साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे.
मागणीत निम्म्याने घट
गणेश मंडळांनी यंदा देखावे न करता छोट्या आकाराच्या मंडपात केवळ गणेश मूर्ती बसविण्याचे नियोजन केले आहे. यंदा बहुतांश मंडळांनी वर्गणी घेणे टाळले आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. पर्यायाने, गणेश मंडळांकडून यंदा सजावट साहित्याला अपेक्षित मागणी नाही. त्याचा परिणाम विद्युतमाळांच्या विक्रीवर देखील झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने मागणी घटली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा होणार असल्याने त्याचा परिणाम विद्युतमाळांच्या विक्रीवर झाला आहे. घरगुती स्वरुपात बसविण्यात येणाऱ्या गणेशमूर्तींना सजावट करण्यासाठीच सध्या विद्युतमाळांना मागणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी मागणी घटली आहे.
– विनोद तलरेजा, विक्रेते.