पायल तडवी आत्महत्या प्रकरण; तिघा आरोपी महिला डॉक्टरांना दिलासा नाही
मुंबई: डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील संशयीत आरोपी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने आज नकार दिला. या तिघाही आरोपींना त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रुग्णालयात तूर्तास जाता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
नायर रुग्णालयाने आरोपींना रुग्णालयात न येण्याच्या भुमीकेमुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला. मात्र जामीन देताना घालण्यात आलेल्या काही अटी शिथील केल्या. दररोज पोलीस ठाण्यास हजेरी लावण्याची घालण्यात आलेली अट न्यायालयाने शिथील करताना न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय राज्याबाहेर जाऊन नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच आरोपींचे वैद्यकिय परवाने रद्द करण्याबाबतचे आदेश न्यायालयाने मागे घेतले.
डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी जामीन देताना घालण्यात आलेल्या अटी शिथील कराव्यात. तसेच उर्वरीत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रुग्णालयात प्रवेश करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूमर्ती साधना जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली.