प्राधान्य क्रमाच्या क्षेत्रातील ग्राहकांना कर्ज मिळणार
पुणे – कर्ज वाटप शक्य तितक्या लवकर वाढावे याकरिता बॅंका प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. आता बॅंका काही “एनबीएफसी’बरोबर सहकार्य करून सह-कर्जवाटप म्हणजे को- लेंडिंग करण्यावर विचार करीत आहेत. अर्थात यासाठी भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने पुढाकार घेतला आहे. स्टेट बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यासाठी स्टेट बॅंक 4 ते 5 मध्यम आणि मोठ्या “एनबीएफसी’बरोबर सहकार्य करार करणार आहे. सध्या बॅंका आणि “एनबीएफसी’ची माहिती तंत्रज्ञान प्रणाली वेगळी आहे. ही प्रणाली एक दुसऱ्याशी जोडण्यामध्ये काही तांत्रिक आणि कायदेशीर अडथळे आहेत. ते दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाचे एकिकरण झाल्यावर को-लेंडिंग सुरू करण्यात येणार आहे. तसेच, यामध्ये केवळ तंत्रज्ञान असेल मानवी हस्तक्षेप नसेल. त्यामुळे गैरप्रकार होण्याची शक्यता कमी आहे.
इतर बॅंकाही प्रयोग राबविणार
30 ते 40 दिवसांत ही योजना सुरू करण्यात येणार आहे. “एनबीएफसी’ भारतात मोठ्या प्रमाणात कर्जाचे वितरण करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्या अडचणी आल्या आहेत. या व्यवस्थेमुळे त्यांचे आरोग्य लवकर सुधारण्यास मदत होणार आहे. स्टेट बॅंकेने हा प्रयोग यशस्वी केल्यानंतर इतर बॅंकाही हा प्रयोग करणार आहेत. किंबहुना काही बॅंकांनी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे प्राधान्य क्रमाच्या क्षेत्रांना कर्ज वितरणाचे जे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे ते पूर्ण करण्यास मदत होणार आहे.