घरासाठी बॅंका जास्त कर्ज देऊ शकणार

रिझर्व्ह बॅंकेकडून जोखीम तरतुदीसाठीच्या रकमेत घट

मुंबई – घरासाठी बॅंकांकडून कर्जपुरवठा वाढविण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने जोखिमीसंदर्भातील नियम शिथिल केले आहेत. यामुळे बॅंका आणि कर्ज घेणाऱ्यांनाही लाभ होणार आहे. याअगोदर घरासाठी कर्ज देणे अधिक जोखमीचे असल्याचा नियम लागू होता. त्यामुळे असे कर्ज देताना बॅंकांना अधिक रकमेची तरतूद करावी लागत असे. आता हे जोखमीचे प्रमाण रिझर्व्ह बॅंकेने कमी केले आहे. 

31 मार्च 2022 पर्यंत जोखमीचे प्रमाण कमी केलेला निर्णय अंमलात राहील. आता जोखमीचे प्रमाण फक्‍त कर्जाच्या मूल्याच्या प्रमाणाशी (एलटीव्ही -लोन टू व्हॅल्यू रेशो) जोडले जाणार आहे. जर एलटीव्ही 80 टक्‍के किंवा त्यापेक्षा कमी असेल तर जोखमीचे प्रमाण केवळ 35 टक्‍के राहील. जर एलटीव्ही 80 टक्‍केपेक्षा जास्त व 90 टक्‍के किंवा त्यापेक्षा कमी असेल तर जोखमीचे प्रमाण 50 राहणार आहे.

अगोदर जोखमीचे प्रमाण एलटीव्हीबरोबरच घराच्या मूल्याशी जोडले जात होते. त्यामुळे जोखीम जास्त भरत होती आणि त्या प्रमाणामध्ये घरासाठी कर्ज दिल्यानंतर बॅंकांना अधिक रकमेची तरतूद करावी लागत होती.

आता जोखमीचे प्रमाण बरेच कमी झाल्यामुळे बॅंका कमी तरतूद करून ग्राहकांना आकर्षक व्याजदरात कर्ज उपलब्ध करू शकतील. त्याचा बॅंका व ग्राहकांबरोबरच विकसकांना लाभ होणार आहे. घरासाठीच्या कर्जाचे वितरण वाढण्यासाठी मदत होणार आहे.

घरनिर्मिती क्षेत्र देशामध्ये सर्वांत अधिक रोजगार निर्माण करते. त्यामुळे हे क्षेत्र पुनरुज्जीवित होण्याची गरज आहे. यासाठी घरासाठीच्या कर्ज जोखमीच्या प्रमाणात आवश्‍यक बदल केला असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले.

हे ही… वाचा… घरांसाठीचा कर्जपुरवठा वाढेल – सतीश मगर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.