पुणे – सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक ऑफ महाराष्ट्रने आपल्या निधी आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) कमी केलेला आहे. सलग पाचव्या महिन्यांत बॅंकेने निधी आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) कमी केलेला आहे. एक दिवसाच्या मुदतीसाठी 7.00 टक्क्यांवरून 6.80 टक्के, एक महिन्यासाठी 7.10 टक्क्यांऐवजी 6.90 टक्के आणि एक वर्षासाठी 7.50 टक्क्यांऐवजी 7.40 टक्के याप्रमाणे व्याजदरात कपात केली आहे.
आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळावी हा या दरकपातीमागील उद्देश आहे. त्याचप्रमाणे शेतकरी व किरकोळ ग्राहकांसाठीच्या सोने तारण कर्जावरील व्याजदरातही बॅंकेने कपात केली आहे.
शेतकऱ्यांना आता कृषी सुवर्ण कर्ज 1 वर्ष मुदतीच्या एमसीएलआर दराने म्हणजे 7.40 टक्के या दराने उपलब्ध होईल (7.80 टक्के ऐवजी). किरकोळ सुवर्ण कर्जावरील व्याजदर देखील 8.00 टक्के वरुन 7.50 टक्के इतका कमी केला आहे. सध्याची कोविड साथीची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी व किरकोळ ग्राहकांची मदत व्हावी म्हणून सोने तारण कर्जावरील व्याजदरात बॅंकेने कपात केली आहे.
कॅनरा बॅंकेचाही पुढाकार
सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बॅंकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेसड् व्याजदरात म्हणजे एमसीएलआरमध्ये तब्बल 0.30 टक्क्यापर्यंत कपात केली आहे. बॅंकेने शेअरबाजाराला कळवलेल्या माहितीत म्हटले आहे की, एक महिन्यासाठीच्या व्याजदरात 0.20 टक्क्यांची कपात करून तो आता 7 टक्के इतका करण्यात आला आहे. तीन महिन्यांसाठीचा एमसीएलआर दर अगोदर 7.45 टक्के होता तो आता 7.15 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांसाठीचा हा व्याजदर 7.50 टक्क्यांवरून 7.40 टक्के करण्यात आला आहे. एक वर्षासाठीचा व्याजदर 7.55 टक्क्यावरून 7.45 टक्के करण्यात आला आहे. कमी गेलेले व्याजदर 7 ऑगस्टपासून अंमलात येणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.
कशामुळे व्याजदर कपात
रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी जाहीर केलेल्या पतधोरणात आपल्या कोणत्याही व्याजदरात बदल केलेला नाही. रेपोदर चार टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपोदर 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंकेने करोनाचा सामना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास व्याजदरात कपात करण्याची शक्यता खुली ठेवली आहे. याचा अर्थ आगामी काळात व्याजदरात कपात केली जाऊ शकते असा घेतला जात आहे. त्यामुळे व्यावसायिक बॅंका सध्या भांडवल सुलभता मुबलक असल्यामुळे व्याजदरात कपात करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.