बॅंकांच्या संपामुळे आर्थिक व्यवहार थंडावले

सातारा  – केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच राष्ट्रीयीकृत बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजपासून सुरू केलेल्या संपामुळे साताऱ्यात बॅंकिंग सेवा विस्कळीत झाली आहे. दोन दिवसांचा संप आणि रविवारची (दि. 2 फेब्रुवारी) सुट्टी यामुळे बॅंका तीन दिवस बंद राहणार आहेत. या संपात नागरी सहकारी बॅंका सहभागी नसल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनने महिनाअखेरीस संपाची हाक दिली होती. पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी बॅंक अधिकारी व कर्मचारी महिनाअखेरीस म्हणजे आजपासून संपावर गेले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या उद्या (दि. 1 फेब्रुवारी) लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्याचा मुहूर्त साधून हा संप करण्यात आला आहे.

या संपामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले होते. स्टेट बॅंकेचे क्‍लिअरिंग हाऊस व अन्य बॅंकांच्या शाखा शुक्रवारी दिवसभर बंद राहिल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. प्रतापगंज पेठेत स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत पैसे काढण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना माघारी जावे लागले. एटीएमवर नागरिकांची गर्दी दिसत होती. काही एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहकांची निराशा झाली.

यानंतर मार्च महिन्यात तीन दिवस आणि 1 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बॅंक अधिकारी व कर्मचारी संघटनांनी दिला आहे. या आधी 8 जानेवारीला झालेल्या संपात बॅंक कर्मचाऱ्यांच्या सहा संघटनांनी भाग घेतला होता. देशभरातील बॅंकांचे कामकाज सलग तीन दिवस ठप्प राहणार असल्याने शासकीय नोकरदारांचा पगारही विलंबाने होण्याची शक्‍यता असून एटीएममध्ये पैशांची टंचाई भासणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.