न्यूयॉर्क -अमेरिकेच्या कर्ज मर्यादा वाढवण्याच्या आशा लवकरच धुळीला मिळाल्या आहेत. सोमवारी अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतल्यानंतर, प्रतिनिधीगृहातील रिपब्लिकन पक्षाचे नेते केविन मॅकार्थी यांनी सांगितले की, त्यांचे संभाषण “फलदायी’ ठरले. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाच्या बैठकीत दोन्ही बाजूंच्या चर्चेत प्रगती झाली नसल्याचे सांगितले.
दरम्यान, अमेरिकन ट्रेझरीने फेडरल सरकारी एजन्सींना त्यांची पुढील देयके पुढे ढकलता येतील का, ते पाहण्यास सांगितले आहे. आता बायडेन प्रशासनाचे अधिकारी इतर वस्तूंमध्ये पैसे वाचवण्याचे मार्ग शोधत आहेत, जेणेकरुन जास्तीत जास्त काळ कर्ज चुकते करणे टाळता येईल.
सोमवारी ट्रेझरी विभागाकडे फक्त 57 अब्ज डॉलर शिल्लक होते. ही रक्कम 1 जूनपर्यंत खर्च केली जाईल. नंतर अमेरिका दिवाळखोरीच्या स्थितीत पोहोचेल, असा इशारा अर्थ विभागाने दिला आहे. म्हणूनच प्रशासन काटकसर करीत आहे. प्रशासनाला यात यश आले तरी ही थकबाकी काही दिवसच टाळता येणार आहे.
कर्ज मर्यादा वाढवण्याच्या मुद्द्यांवर रिपब्लिकन पक्षासोबत करार करण्यासाठी अध्यक्ष बायडेन यांना आणखी काही वेळ हवा आहे. अमेरिकी संसदेने 31.4 ट्रिलियन डॉलरपर्यंत कर्ज घेण्याची तरतूद केली होती. सरकारने ही मर्यादा गाठली आहे. आता कॉंग्रेसच्या मंजुरीनंतरच यापेक्षा जास्त कर्ज घेता येणार आहे. तरिही 8 किंवा 9 जूनला दिवाळखोरीचा हा प्रश्न पुन्हा आ वासून समोर उभा ठाकणार आहेच.