बॅंक घोटाळे : सीबीआयचे देशभरात 169 ठिकाणी छापे

महाराष्ट्रासह देशातील अनेक बॅंकामध्ये तब्बल 7 हजार कोटींचा घोटाळा
छाप्यात कागदपत्रासह अनेक महत्वाचे दस्तावेज जप्त

नवी दिल्ली : देशभरात रोज कोणत्या ना कोणत्या बॅंकांचे घोटाळे समोर येत आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर आज सीबीआयने देशातील तब्बल 169 ठिकाणी छापेमारी केली आहे. या छाप्यात अनेक बॅंकांचे घोटाळे उघड झाले असून यात तब्बल 7 हजार कोटींचा घोटाळा झाल्याची धक्‍कादायक माहिती उघड झाली आहे. आंध्रप्रदेश, चंदीगढ, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य पद्रेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडु, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांच्यासह दादर आणि नगर हवेलीमध्येदेखील सीबीआयने छापे टाकले असल्याचे सांगण्यात येत आहे.

पीएमसी बॅंकेचा घोटाळा ताजा असताना सीबीआयने महाराष्ट्रासह देशभरात छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. देशभरातल्या विविध बॅंकांमध्ये तब्बल 7 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा हा घोटाळा असून त्यात मोठ्या व्यक्‍तींचा समावेश असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. बॅंक घोटाळ्यांच्या 35 प्रकरणी सीबीआयकडे गुन्हा नोंदवला गेला आहे. त्याच्या तपासासाठी ही कारवाई करण्यात आली असून विविध राज्यांमध्ये 169 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

सीबीआयला या छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्र, महत्त्वांच्या फाईल्स, लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर कागदपत्र जप्त केली आहेत. बॅंकेच्या संचालक मंडळावर असलेल्या लोकांनी आपल्या नातेवाईक आणि संबंधीत लोकांना भरमसाठ कर्ज वाटायची आणि ती नंतर भरायचीच नाही असा उद्योग अनेक ठिकाणी सुरू होता. त्याच पार्श्‍वभूमीवर हे छापे टाकण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात कोणत्याही बॅंकांमध्ये घोटाळा झाला तर त्यात सामान्य माणूसच भरडला जातो. नुकत्याच झालेल्या पीएमसी बॅंक घोटाळ्यात रिझर्व्ह बॅंकेनेही निर्बंध आणल्याने अनेक बॅंकांमध्ये लोकांना पैसे काढणेही अवघड झाले आहे. अशा घटना घडत राहिल्या तर लोकांचा बॅंकिंग सिस्टिमवरचा विश्वासच उडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वच बॅंकांनी आपल्या व्यवहारात सुधारणा करत पारदर्शकता आणावी असे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत. दरम्यान, आज सीबीआयने केलेल्या कारवाईत आणखी काही महत्वाची माहिती उघड होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.