डिजिटल व्यवहारात महाराष्ट्र बॅंक नंबर 1

पुणे- डिजिटल व्यवहारांमध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र डिसेंबर महिन्यात देशांमध्ये सर्व बॅंकात पहिल्या क्रमांकावर आली आहे. यामध्ये सरकारी बॅंकांबरोबरच खासगी आणि सहकारी बॅंकांचाही विचार केलेला आहे. ही आकडेवारी माहिती तंत्रज्ञान मंत्रालय संकलित करते.

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र बॅंकेला या मुल्यांकनात 77 गुण मिळाले आहेत. डिजिटल ट्रांजेक्‍शन उद्दिष्ट 102.70 टक्‍के पूर्ण झाले आहे. तर मर्चंट डिप्लॉयमेंट उद्दिष्ट 100 टक्‍के पूर्ण झाले आहे.

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पहिल्या पन्नास बॅंकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर बॅंक ऑफ महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावर येस बॅंक, तिसऱ्या क्रमांकावर एचडीएफसी बॅंक, चौथ्या क्रमांकावर फिनो बॅंक आणि पाचव्या क्रमांकावर आयसीआयसीआय बॅंकेचा समावेश करण्यात आला आहे.

एकूण डिजिटल व्यवहारांमध्ये केवळ 13 बॅंकांची कामगिरी समाधानकारक आहे. 28 बॅंकांची कामगिरी सर्वसाधारण आहे. तर 9 बॅंकांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने विविध बॅंकांना डिजिटल व्यवहारासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा विकसित करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात या बॅंकांना उद्दिष्ट ही ठरवून देण्यात आले आहे.

महाराष्ट्र बॅंकेने सुरुवातीपासून सुरक्षित डिजिटल व्यवहार व्हावेत याकरिता मजबूत माहिती तंत्रज्ञान यंत्रणा विकसित केली आहे आणि वेळोवेळी ती सुरळीत चालेल याकडे लक्ष दिले जाते. यामुळेच बॅंक डिजिटल व्यवहारांमध्ये आता पहिल्या क्रमांकावर आली आहे.

सर्व निकषांवर महाराष्ट्र बॅंकेची कामगिरी उत्तम
डिजिटल पेमेंट व्यवहार, ग्रामीण भागात नवे व्यापारी जोडणे, उत्तर-पूर्व भागात नवे व्यापारी जोडणे, भीम ऍपचा वापर वाढविणे, यूटीआयचा वापर वाढविणे अशा निकषांवर हे मूल्यांकन केले जाते. त्या सर्व निकषांवर महाराष्ट्र बॅंकेने उत्तम कामगिरी करून 77 म्हणजे सर्वाधिक गुण मिळविले आहेत. यापेक्षा इतर सर्व सरकारी आणि खासगी बॅंकांना कमी गुण मिळाले आहेत.

डिसेंबरमध्ये 2.92 कोटी डिजिटल व्यवहार
डिसेंबरमध्ये महाराष्ट्र बॅंकेच्या माध्यमातून तब्बल 2.92 कोटी इतके डिजिटल व्यवहार करण्यात आले. त्यामध्ये भीम, डेबिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंग, मोबाइल बॅंकिंग, एनईएफटी, आरटीजीएस आणि इतर व्यवहारांचा समावेश आहे. सर्व क्षेत्रांत महाराष्ट्र बॅंक महिन्याच्या पातळीवर चांगली कामगिरी करीत असल्याचे दिसून येते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.