पुणे – सार्वजनिक बॅंकांच्या जून 2022 मधील संपलेल्या पहिल्या तिमाही मधील व्यवसाय वाढीच्या बाबत प्रकाशित आकडेवारी नुसार बॅंक ऑफ महाराष्ट्रने एकूण कर्ज व्यवहारात 27.10 % वाढ नोंदवून रु 1, 40,561 कोटी कर्जाचे वाटप केले. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बॅंकांमध्ये ठेवी आणि कर्ज व्यवहाराच्या वाढीतील टक्केवारीमध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्रने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बॅंक व बॅंक ऑफ बडोदा यांनी कर्ज व्यवहारात अनक्रमे 16.43 % व 15.73 % वृद्धी नोंदवून दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. स्टेट बॅंकेने कर्ज व्यवहारात 13.66 वाढ नोंदवून चौथा क्रमांक पटकावला.
ठेवींच्या वाढीचा विचार करता , बॅंक ऑफ महाराष्ट्राने जून 2022 अखेर समाप्त तिमाहीमध्ये ठेवींमध्ये 12.35 % वाढ नोंदवून एकूण ठेवी रु 1,95,099 कोटी प्राप्त केल्या आहेत. युनियन बॅंक ऑफ इंडियाने ठेवींमध्ये 9.42 % वाढ ( रु 9,92,517 कोटी ) नोंदवून दुसरा क्रमांक व बॅंक ऑफ बडोदाने 8.51 % वाढ ( रु 9,09,095 कोटी ) नोंदवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
एकूण व निव्वळ अनुत्पादक कर्जांचा विचार करता बॅंक ऑफ महाराष्ट्र व भारतीय स्टेट बॅंक यांनी सर्वात कमी चतुर्थकाची नोंद केली आहे आहे. जून 2022 मध्ये समाप्त पहिल्या तिमाहीत सर्व सार्वजनिक बॅंकिंग क्षेत्रातील सरकारी बॅंकांनी मिळून रु 15306 कोटी नफा प्राप्त केला असून त्यामध्ये 9.2 % वार्षिक वृद्धी नोंदविली आहे. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बॅंका असलेल्या भारतीय स्टेट बॅंक व पंजाब नॅशनल बॅंकेने जून तिमाहीत कमी नफा नोंदविला आहे.
सद्य वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बॅंक ऑफ महाराष्ट्र व भारतीय स्टेट बॅंक ह्यांनी अनुक्रमे 3.74 % व 3.91 % कर्जे अनुत्पादक म्हणून घोषित केले आहेत. तसेच जून 2022 मध्ये समाप्त तिमाहीत सदर दोन्ही बॅंकांची निव्वळ अनुत्पादक कर्जे अनुक्रमे 0.88 % व 1 % पर्यंत कमी झाली आहेत.