निदर्शने, मोर्चा, जिल्हाधिकारी यांना निवेदन
नगर – बॅंक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या द्विपक्षीय कराराला आईबीएकडून होत असलेल्या विलंबामुळे बॅंक कर्मचारी व अधिकारी संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली असून हा करार लवकरात लवकर करण्यात यावा यासाठी आईबीएचे लक्ष वेधण्यासाठी बॅंकांमधील अग्रणी युनाइटेड फोरम ऑफ बॅंक्स युनिअन्सने दिनांक 31 जानेवारी व 01 फेब्रुवारी 2020 रोजी दोन दिवसाच्या बॅंक बंदचे आवाहन केले आहे. नगर शहरात याप्रसंगी यूको बॅंक चितळे रोड येथे बॅंक कर्मचारी व अधिकाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी कॉ.सुजित उदरभरे, कॉ.उल्हास देसाई, कॉ.माणिक अडाणे, कॉ.गिरिष देशपांडे, कॉ.सायली शिंदे, कॉ.संदिप फंड, कॉ.विकास निकाळजे, कॉ.प्रकाश कोटा, कॉ.अच्युत देशमुख आदिंसह बॅंक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपास राज्य कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला, यावेळी सुभाष तळेकर, पेद्राम आदि उपस्थित होते.
कॉ.उल्हास देसाई म्हणाले कि, बॅंक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या द्विपक्षीय कराराची मुदत 31 ऑक्टोबर 2017 ला संपली व 01 नोव्हेंबर 2017 पासून नवीन वेतन श्रेणी लागू व्हावयास होती. यासाठी संघटनांनी मुदत संपण्यापूर्वीच आपल्या मागण्या आईबीएला सादर केल्या होत्या. परंतु आईबीएने अत्यंत संथ गतीने वाटाघाटीस सुरवात केली.व आज 27 महिने पूर्ण होऊन सुद्धा कोणताही निर्णय झालेला नाही.
वाटाघाटीच्या पहिल्या सभेत आई बी ए ने बॅंक कर्मचारी व अधिकाऱ्यांना केवळ 2 टक्के लज्जास्पद व अपमानजनक पगारवाढ सुचवून बॅंक कर्मचारी व अधिकाऱ्यांची एक प्रकारे थट्टा केली. बॅंक्स संघटनांनी त्याचा ताबडतोब निषेध नोंदवला व निदर्शने केली. परंतु आशावादी बॅंक संघटनांनी विश्वास ठेवून कोणतेही संघर्षाचे पाऊल उचलले नाही. तरीही आईबीएने आपली भूमिका ताठर ठेवून वेळकाढूपणा अवलंबविला व कोणत्याही परिस्थितीत मागण्याप्रमाणे वेतनवाढ देता येणार नाही असा सूर लावून धरला.
भाषणांनंतर कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येऊन त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. सभेला मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. उद्या दिनांक 01 फेब्रुवारी 2020 रोजी भारतीय स्टेट बॅंक लालटाकी याठिकाणी निदर्शने आयोजित केले असून सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.