बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

मुंबई – संत सेवालाल महाराज यांचे वंशज बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे काल (30 ऑक्टोबर) रात्री दिर्घ आजाराने निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. मुंबईतील लिलावती रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामराव महाराज हे वाशिम जिल्ह्यातील पोहरीदेवी संस्थानचे प्रमुख होते.

श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे 17 ऑक्टोबरला त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्रास अधिक वाढल्यामुळे त्यांचे काल रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. रामराव महाराज यांच्या निधनाने संपूर्ण बंजारा समाजासह राज्यावर शोककळा पसरली आहे.

रामराव महाराज हे 1948 मध्ये पोहरादेवी येथील गादीवर बसले होते. तेंव्हापासून त्यांनी अन्नत्याग केला होता. ते फक्त कडूनिंब, फळं आणि दूध सेवन करत असत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना दूध घेतानाही त्रास होत होता. म्हणून ते फक्त फळांचा रस आणि कडूनिंब याचेच सेवन करत असत. मात्र, श्वास घेण्यास होणारा त्रास वाढल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

श्री क्षेत्र पोहरादेवी संस्थान हे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून हे ठिकाण राज्यात प्रसिद्ध आहे. रामराव महाराज यांच्या निधनानंतर राज्यासह देशभरातील व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.