जालना – गैरबंजारा समाजाच्या नागरीकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याचा प्रकार जालन्यात उघडकीस आला आहे. या घटनेचा बंजारा समाजाच्या नागरिकांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. जालन्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून हे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहे.
विशाल मोरे, किशोर भिडे यांच्यासह आणखी दोन जणांच्या नावाने हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यांसह आणखी किती जणांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे याविषयीची सखोल चौकशी व्हावी. बंजारा समाजाच्या नावाने प्रमाणपत्र घेणाऱ्यांसह प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच विधिमंडळात याप्रकरणी प्रश्न उपस्थित करणार असून दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे देखील राठोड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बंजारा समाजातील काही कार्यकर्त्यांनी आज या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.