गोवाहटी – बांगलादेशातील एका दहशतवादी संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला आसामच्या बोंगाईगांव जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. मार्च महिन्यापासून अशाप्रकारे आसाममध्ये अटक करण्यात आलेला हा 12 वा दहशतवादी आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.सईद अहमद नावाच्या या संशयित दहशतवाद्याला आसाममधील माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले असून त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, असे बोंगाईगांवचे पोलीस अधिक्षक स्वप्ननील डेका यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
त्रिपुरामध्ये अटक करण्यात आलेल्या तीन अन्य जिहादींनी दिलेल्या माहितीच्या आधारे या संशयिताला अटक करण्यात आले आहे. हा दहशतवादी अन्सारुल्लाह बांगला टीम या बांगलादेशातील दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा संशय आहे.बोंगाईगावच्या सीमेला लागून असलेल्या बारपेटा जिल्ह्य़ातील हाऊलीजवळील ढकियापारा गावात दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण केंद्र उघड केले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.