मनसेचा घुसखोरांना पोस्टर्सव्दारे निर्वाणीचा इशारा
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या अधिवेशनानंतर पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेतला आहे. मनसेच्या या अजेंड्यात राज्यातील बांगलादेशी नागरिकांना हुसकावून लावण्याला प्राधान्यक्रम देण्यात आले आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनातही पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी हाच इशारा दिला होता. त्यानंतर आता नवी मुंबईतील पनवेलच्या रस्त्यांवर यासंदर्भातील पोस्टर्स झळकली आहेत. यामध्ये मनसेने बांगलादेशींना भारत सोडण्यास सांगतले आहे, तसेच जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना मनसेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल, अशा शब्दांत निर्वाणीचा इशाराही देण्यात आला आहे. या पोस्टर्सचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर राज ठाकरे यांच्यासह त्यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचा फोटो पहिल्यांदाच झळकला आहे.
Maharashtra: Posters of Maharashtra Navnirman Sena (MNS) stating ‘Bangladeshis leaves the country,otherwise you’ll be driven out in MNS style’ seen in Panvel of Raigad dist. Posters also shows the pictures of MNS Chief Raj Thackeray&his son & party leader Amit Thackeray. (03.02) pic.twitter.com/0mnNk5b0YR
— ANI (@ANI) February 4, 2020
पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून पक्षाच्यावतीने 9 फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी मनसेनं मुंबई पोलिसांकडे दोन मार्ग सुचवले होते. त्यातील एका मार्गाला पोलिसांनी परवानगी दिली असून, मोर्चाचा मार्ग ठरला आहे. मनसेच्या पहिल्या अधिवेशनात भारतातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.
मोर्चा काढण्यातसंदर्भात मनसेने मुंबई पोलिसांना पत्र दिले होते. यात राणीचा बाग ते आझाद मैदान आणि गिरगाव चौपटी ते आझाद मैदान हे दोन मार्ग सूचवण्यात आले होते. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राणीचा बाग ते आझाद मैदान या मार्गावरील मोर्चाला परवानगी नाकारत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मार्गावरील मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे.
मनसेने घुसखोरांविरूद्धचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनसेचा सीएए आणि एनआरसीला पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली होती. मनसेच्या भूमिकेवर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मात्र, नंतर स्वतः पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच यावर खुलासा केला. बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला, असे आपण म्हणालो होतो. सीएएचे समर्थन आम्ही केलेले नाही. आपल्या वक्तव्याचा प्रसार माध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आला, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.