बांगलादेशात भीषण आगीत हजारो झोपड्या भस्मसात

ढाका- बांगलादेशाची राजधानी ढाकामधील अत्यंत दाटीवाटीच्या झोपड्यांना आज लागलेल्या भीषण आगीमध्ये हजारो झोपड्या जळून भस्मसात झाल्या. ढाकामधील मीरपूर भागातील झोपडपट्टीमध्ये काल (शुक्रवारी) रात्रीच्या सुमारास ही आग लागली. या आगीमध्ये किमान 2 हजार झोपड्या जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. या सर्व झोपड्या पत्रा, ताडपती आणि प्लायवूडपासून बांधलेल्या होत्या, असे अग्निशामक दलाचे अधिकारी ईर्शाद हुसैन यांनी सांगितले.

या आगीमध्ये एकही झोपडी वाचवली जाऊ शकली नाही. या झोपडपट्टीमध्ये मजूर, कामगार, किरकोळ फिरते विक्रेते आणि भंगार सामानाचे विक्रेते आणि घाऊक विक्रेते यांच्या दुकानांचा भरणा होता. हे सर्व निम्न उत्पन्न गटातील होते. ईदची सुटी असल्यामुळे बहुतेकजण बाहेरगावी गेले होते. अन्यथा या आगीमध्ये मोठी हानी झाली असती, असे स्थानिक पोलिस प्रमुख गुलाम रब्बानी यांनी सांगितले.

अग्निशामक दलाने या आगीवर आज नियंत्रण मिळवले असून सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही जणांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आगीमुळे 10 हजारापेक्षा अधिक जण बेघर झाले असून त्यांना जवळपासच्य शाळांमध्ये आसरा देण्यात आला आहे. या सर्व कुटुंबांना अन्न, पाणी, मोबाईल टॉयलेटची सुविध आणि वीजपुरवठाही पुरवला जात आहे, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्वांना कायमस्वरुपी निवारा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×