#BANvAFG : शकीबच्या प्रभावापुढे अफगाणिस्तान निष्प्रभ

बांगलादेश 62 धावांनी विजयी

साउदॅम्पटन – शानदार फलंदाजीपाठोपाठ शकीब अल हसन (5-29) याने गोलंदाजीतही करामत दाखविली, त्यामुळेच बांगलादेशने अफगाणिस्तानचा 62 धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या.विजयासाठी 263 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव 47 षटकांत 200 धावांवर आटोपला.

बांगलादेशने 50 षटकांत 7 बाद 262 धावांपर्यंत मजल गाठली. त्यामध्ये शकीबच्या संयमी 51 धावा तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध नाबाद शतक करणारा मुशफिकर रहीम याच्या शैलीदार 83 धावांचा महत्त्वाचा वाटा होता. तमिम इक्‍बाल (36), मोसादिक हुसैन (35) व महमदुल्लाह (27) यांनीही चमकदार खेळ करीत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमान याने 39 धावांमध्ये तीन गडी बाद केले. कर्णधार गुलाबद्दिन नईब याने दोन विकेट्‌स घेतल्या.

नईब व रहमत शाह यांनी अफगाणिस्तानच्या सुरुवात चांगली केली. नईबने दमदार 47 धावा केल्या. रहमत हा 24 धावांवर तंबूत परतला. या दोघांबरोबरच शकीब याने असगर अफगाण (20) व भरवशाचा फलंदाज मोहम्मद नबी (0) यांनाही बाद करीत अफगाणिस्तानला अडचणीत टाकले. समीउल्ला शिनवारी व नजीब उल्ला झाद्रान (23) यांनी झुंजार खेळ करीत ही घसरगुंडी थोपविण्याचा प्रयत्न केला.

संक्षिप्त धावफलक-

बांगलादेश 50 षटकांत 7 बाद 262 (तमिम इक्‍बाल 36, शकीब अल हसन 51, मुशफिकर रहीम 83, मोसादिक हुसैन 35, मुजीब उर रहमान 3-39, गुलाबद्दिन नईब 2-56)

अफगाणिस्तान 47 षटकांत सर्वबाद 200 (गुलाबद्दिन नईब 47, समीउल्ला शिनवारी नाबाद 49, शकीब अल हसन 5-29, मुस्ताफिझूर रेहमान 2-32)

Leave A Reply

Your email address will not be published.