अंतीम सामन्यासह बांगलादेशचा मालिका विजय

वेस्टइंडिजचा 18 धावांनी पराभव

सेंट किट्‌स: सलामीवीर तमिम इक्‍बालने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने अखेरच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 18 धावांनी मात केली आहे. या विजयासह बांगलादेशने 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने तमिम इक्‍बाल 103 आणि मेहमद्दुलाने नाबाद 67 यांच्या फलंदाजीच्या जोरावर निर्धारीत 50 षटकांत 6 बाद 301 धावा करत वेस्ट इंऍडिज समोर विजया साठी 302 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाला मात्र हे आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा डाव 50 षटकांत 6 बाद 283 धावांवरच संपुष्टात आल्याने त्यांना 18 धावांनी पराभुत व्हावे लागले. या विजयाने बांगलादेशने ही मालिका आपल्या खिशात घातली आहे.

302 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईसयांनी पहिल्या दहा षटकांतच संघाचे अर्धशतक फलका वर लावले. मात्र त्यानंतर लागलीच लुईस 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर शाई होप आणि गेल यांनी संघाचा डाव सावरताना संघाला शतकी आकडा गाठुन दिला.

संघाच्या 105 धावा झाल्या असताना गेल 73 धावा करुन बाद झाला. त्यानंतर होप आणि मागच्या सामन्यातील शतकवीर शेरॉन हेथमायर यांनी 13.5 षटकांत 67 धावांची भागीदारी करत संघाला 150 धावांचा टप्पा गाठुन दिला मात्र वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात हेथमायर 30 धावा करुन बाद झाला. त्यावेळी वेस्टइंडिजच्या 172 धावा झाल्या होत्या. त्यानंतर आलेला कायरन पॉवेल देखिल केवळ 4 धावा करुन बाद झाल्याने संघाच्या 4 बाद 179 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मधल्या फळीत रोव्हमन पॉवेलने 41 चेंडूत नाबाद 74 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. 50 षटकांत वेस्ट इंडिजचा संघ 283 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

तत्पूर्वी, सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात काहीशी अडखळती झाली. मात्र तमिम इक्‍बालने एकाबाजूने खिंड लढवत संघाचा डाव सावरला. आपल्या 103 धावांच्या खेळीत तमिमने 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. तमिम इक्‍बाल माघारी परतल्यानंतर मधल्या फळीत मेहमद्दुलाने फटकेबाजी करत नाबाद 67 धावा पटकावल्या. तर मशरफे मोर्तझाने देखिल फटकेबाजी करताना 25 चेंडूत चार चौकार आणि 1 षटकार लगावत वेगवान 35 धावाम्ची खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या ऊभारून दिली. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर आणि ऍशले नर्सने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. दरम्यान मालिकेत दोन शतक झळकावणाऱ्या तमिम इक्‍बालला मालिकावीरा चा तसेच सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मंगळवारपासून दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक – बांगलादेश 50 षटकांत 6 बाद 301 (तमिम इक्‍बाल 103, मेहमदुल्लाह नाबाद 67, शकिब अल हसन 37, ऍश्‍ले नर्स 53-2, जेसन होल्डर 55-2) वि.वि वेस्टइंडिज 50 षटकांत 6 बाद 283 (रोव्हमन पॉवेल नाबाद 74, ख्रिस गेल 73, शाय होप 64, मशरफे मोर्तझा 63-2, रुबेल हुसैन 34-1)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)