बांगलादेशविरुद्ध आज विश्वचषक स्पर्धेतील दुसरी लढत
सामन्याचे ठिकाण – द ओव्हल
सामन्याची वेळ – दुपारी 3.00 वा.
लंडन – विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंडकडून करारी शिकस्त मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिका रविवारी होणा-या दुस-या लढतीत बांगलादेशविरुद्ध विजयी अभियानची सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. तर स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी बांग्लादेशचे खेळाडू सज्ज आहेत.
द. आफ्रिकेला गुरुवारी झालेल्या लढतीत इंग्लंडने 104 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या लढतीत द. आफ्रिकेने इंग्लंडला 8 बाद 311 धावांवर रोखले होते. परंतु जोफ्रा आर्चरच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 207 धावांवरच गुंडाळला. आता द ओव्हल येथे होणा-या सामन्यातून द. आफ्रिकेला वापसी करण्याची संधी आहे. आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाला, इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने संघ खचलेला नाही. या स्पर्धेत प्रत्येक संघाला नउ सामने खेळायचे आहे. यातील शीर्ष चार संघांना उपान्त्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे या सामन्यातून आम्हाला स्पर्धेत विजयी प्रारंभ करता येईल.
डु प्लेसिस म्हणाला, पहिल्या सामन्यात इंग्लंडने तिन्ही क्षेत्रात आमच्या पेक्षा सरस कामगिरी केली. या सामन्यातून आम्हाला चांगला खेळ कसा असतो हे समजले. त्यामुळे आम्ही केलेल्या चुकांवर लक्ष्य केंद्रीत करत आम्ही स्पर्धेत आगेकुच करु, असे त्याने सांगितले.
दुसरीकडे या सामन्यातून बांगलादेश स्पर्धेचा शुभारंभ करत आहे. गेल्या विश्वचषक स्पर्धेत (2015) उपान्त्यपूर्व फेरीपर्यत धडक मारणारा बांगलादेश या स्पर्धेत त्यापेक्षा सरस कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहिल. या स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सराव सामन्यात मासपेशी ताणल्या गेल्याने दुखापतग्रस्त झालेला कर्णधार मशरफे मुर्तजा हा द. आफ्रिकेसोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे.
मुर्तजा म्हणाला, ही दुखापत जास्त गंभीर नाही. मला सुरुवातीच्या एक-दोन षटके करताना थोडा त्रास होतो. त्यानंतर मी सहज खेळू शकतो. तसेच तमीम इकबालही जखमी असल्याने भारताविरुद्ध खेळू शकला नव्हता. तोही या सामन्यात सलामीला फलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे.
प्रतिस्पर्धी संघ :
दक्षिण आफ्रिका – फाफ ड्यु प्लेसिस (कर्णधार), एडन मरक्रम, हाशीम अमला, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुकवायो, डेल स्टेन, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), इम्रान ताहीर, ड्वेन प्रिटोरस, तबरेझ शम्सी, रसी व्हॅन डर दुसे.
बांगलादेश – मशरफे मोर्तझा (कर्णधार), लिट्टन दास (यष्टीरक्षक), तमीम इक्बाल, सौम्य सरकार, मुशफकीर रहीम, शकीब अल हसन, अबू जायेद, महमदुल्लाह, मेहंदी हसन मिर्झा, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसादेक हुसैन, मुस्ताफिझूर रेहमान, रुबेल हुसैन, सब्बीर रहमान.