Bangladesh violence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य ६ जणांच्याविरोधात आज हत्येचे प्रकरण दाखल करण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या हिंसक आंदोलनाच्यावेळी एका दुकानदाराची हत्या झाली होती.
या हत्येला हसीना जबाबदार असल्याचे या प्रकरणात म्हटले आहे. अबू सय्यद या दुकानदाराच्या निकटवर्तीयांनी हसीना यांच्याविरोधात हे प्रकरण दाखल केले आहे. दिनांक १९ जुलै रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अबू सय्यद यांचा मृत्यू झाला होता.
देशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणातील दुरुस्तीच्या समर्थनार्थ मोहम्मदपूर येथे काढलेल्या मोर्चाच्यावेळी ही घटना घडली होती.
अन्य आरोपींमध्ये अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादर, माजी गृहमंत्री असदुझ्झमन खान कमाल आणि माजी पोलिस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून यांचा समावेश आहे.
याशिवाय अनेक अज्ञात उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारीही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहेत. हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याविरोधात दाखल झालेले हे पहिले प्रकरण आहे.
बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनात २३० पेक्षा जास्त लोक ठार झाले होते. या आंदोलनामुळे ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्या देश सोडून निघून गेल्या.