जिनिव्हा – बांगलादेशात गेल्या सहा आठवड्यात विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाविरोधात केल्या गेलेल्या कारवाईदरम्यान १,४०० जण ठार झाल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या मानव अधिकार कार्यालयाने व्यक्त केला आहे. बांगलादेशातील सुरक्षा दल आणि गुप्तचर संस्थांनी नियोजनबद्धरितीने मानवी हक्कांची पायमल्ली केली आहे. ही कृती मानवतेविरुद्धचे गुन्हे मानले जाऊ शकतात. या कृतीबाबत अधिक तपास होणे गरजेचे आहे, असे जिनिव्हास्थित संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
दिनांक १ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांविरोधात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनामध्ये किमान १,४०० लोक ठार झाले आहेत. तर हजारो जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्या बहुतेकांचा मृत्यू बांगलादेशच्या सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारामुळे झाला असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
निदर्शने दडपण्यासाठी राजकीय नेतृत्व आणि उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहिती आणि समन्वयाने न्यायबाह्य हत्या, मनमानी पद्धतीने व्यापक प्रमाणात ताब्यात घेतले जाणे, अटक आणि छळ करण्यात आला असल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी नोंदवले आहे.
बांगलादेशातील डॉ. युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारच्या निमंत्रणावरून संयुक्त राष्ट्राचे सत्यशोधन पथक बांगलादेशात आले होते. शेख हसीना यांना ज्या आंदोलनामुळे देश सोडून जावे लागले, त्यामागीत तथ्य शोधून काढण्यासाठी हे पथक बांगलादेशात गेले होते. सरकारी नोकऱ्यांमधील कोटा पद्धतीवरून शेख हसीना यांच्या सरकारवर नाराज असलेल्या विद्यार्थ्यांच्या शांततापुर्ण आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले होते.