Bangladesh Violence । बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर आंदोलकांच्या तालिबानी कारवाया समोर आल्या आहेत. याठिकाणी जेसोरमध्ये आंदोलकांनी एका हॉटेलला पेटवून दिले. ज्यात किमान 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 84 जण जखमी झाले. हॉटेलचे मालक जेसोर जिल्ह्यातील अवामी लीगचे सरचिटणीस शाहीन चकलादार होते.
उपायुक्त अबरारुल इस्लाम यांनी घटनेला दुजोरा दिला. 20 वर्षीय छयन आणि 19 वर्षीय सेजान हुसेन अशी दोन मृतांची नावे आहेत. हॉस्पिटलचे कर्मचारी हारुण रशीद यांनी, त्याठिकाणी किमान ८४ लोक उपचार घेत आहेत, त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत, अशी माहिती दिली.
शहरात ठिकठिकाणी हजारो लोक पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याचा जल्लोष करत होते. उत्सवादरम्यान काही लोकांनी चित्तमोर परिसरातील जबीर हॉटेलला आग लावली आणि त्यातील फर्निचर फोडले. दरम्यान, हल्लेखोरांनी जिल्हा अवामी लीगच्या कार्यालयावर आणि शारशा आणि बेनापोल भागातील आणखी तीन अवामी लीग नेत्यांच्या घरांवर हल्ला केला.
आतापर्यंत 300 जणांचा बळी Bangladesh Violence ।
बांगलादेशात जाळपोळ आणि हिंसाचारामुळे आतापर्यंत 300 जणांना जीव गमवावा लागला आहे. असा दावा एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तात सोमवारी करण्यात आला आहे. तथापि, मृत्यूच्या आकड्यांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही की मृत्यूची संख्या 300 आहे. एएफपीने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, रविवारी बांगलादेशच्या रस्त्यावर हिंसाचार झाला. मृतांची संख्या किमान 300 वर पोहोचली आहे.
100 लोकांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी Bangladesh Violence ।
चकमकीत 100 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे. तथापि, एएफपीने आपल्या अहवालात मृतांची संख्या किमान 300 असल्याचे म्हटले आहे. रविवारी झालेल्या भीषण चकमकीत 14 पोलिसांसह 100 जण ठार झाले, तर शेकडो जण जखमी झाले.