दुबई – श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवल्यानंतर बांगलादेशच्या संघाने आयसीसीच्या विश्वकरंडक सुपर लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्याने बांगलादेशचा 2023 साली होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.
सुपर लीग स्पर्धेत बांगलादेशने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यापैकी 5 लढतीत त्यांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशचे 50 गुण असून, ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आले आहेत. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा संघ असून, त्यांचे 40 गुण आहेत.
इंग्लंडने 9 पैकी 4 लढतीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर असून, त्यांचेदेखील 40 गुण आहेत. पाकने 6 पैकी 4 लढतीत विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडीज यांचे प्रत्येकी 30 गुण असून, ते पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. भारतीय संघाने वन डे सुपर लीगमध्ये 6 सामने खेळले असून, त्यापैकी 3 मध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे ते आठव्या क्रमांकावर आहेत. गुणतक्यात भारताच्या नंतर झिम्बाब्वे, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलंड हे संघ आहेत.