Pakistan vs Bangladesh Test Series : बांगलादेश संघाला पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. आता या मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघात 16 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. दरम्यान, अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनचे बांगलादेश कसोटी क्रिकेट संघात पुनरागमन झाले आहे. नजमुल हसन शांतोला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
शाकिब अल हसनचे पुनरागमन…
शाकिब अल हसन मार्च 2024 मध्ये बांगलादेशकडून शेवटचा कसोटी क्रिकेट खेळला होता. त्यावेळी बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचे यजमानपद भूषवले होते. तेव्हापासून, शाकिब टी-20 विश्वचषकपासून युएसए मधील मेजर लीग क्रिकेट आणि ग्लोबल टी-20 कॅनडा लीग पर्यंत केवळ टी-20 क्रिकेट खेळत आहे. शकीबशिवाय मुशफिकुर रहीम आणि तस्किन अहमद यांनाही संघात संधी मिळाली आहे. तस्किन 30 ऑगस्टपासून सुरू होणारी दुसरी कसोटी खेळणार आहे.
राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष गाझी अशरफ हुसैन यांनी सांगितले की, तस्किन अहमद फक्त दुसरी कसोटी खेळणार हे लक्षात घेऊन आम्ही पाच वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. गेल्या वर्षी जूनपासून त्याने कसोटीत गोलंदाजी केलेली नाही. या कारणास्तव, आम्ही त्याला पाकिस्तान-अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यासाठी अ संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये लय मिळवणे सोपे होणार आहे.
The Bangladesh squad for the upcoming ICC World Test Championship against Pakistan has been announced. The first Test begins on August 21 in Rawalpindi, followed by the second match on August 30 in Karachi.#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PCB #BANvsPAK pic.twitter.com/5c0MPUOJ77
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 11, 2024
बांगलादेश कसोटी संघ :नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकिर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, शोरफुल इस्लाम , हसन महमूद, तस्कीन अहमद आणि सैयद खालिद अहमद.
आतापर्यंत पाकिस्तानचेच वर्चस्व…
बांगलादेश संघाने आतापर्यंत पाकिस्तानसोबत 6 कसोटी मालिका खेळल्या आहेत, मात्र एकही जिंकण्यात त्यांना यश आलेले नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 12 पाकिस्तानने जिंकले आहेत. एक कसोटी ड्रॉ झाली आहे. बांगलादेशचा संघ 13 ऑगस्टला लाहोरला पोहोचेल आणि 17 ऑगस्टला इस्लामाबादला जाण्यापूर्वी 14 ते 16 ऑगस्टपर्यंत गद्दाफी स्टेडियममध्ये सराव करेल.